संजय राऊत सोनू सूदवर घसरले, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 7 June 2020

. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करत आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनूच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. 

खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष... 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

मजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय ?

मुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'!

सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता

कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,' असा प्रश्न लेखात उपस्थित केलाय. 'सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut on Sonu Sood, said that