मुंबईत चार्टर्ड विमानाने हृदय आणले, हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

कृष्णा जोशी
Friday, 2 October 2020

पुण्याहून चार्टर्ड विमानाने ब्रेन डेड दात्याचे हृदय मुंबईत आणून ते गरजूवर बसविण्याची शस्त्रक्रिया सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात करण्यात आली.

मुंबईः पुण्याहून चार्टर्ड विमानाने ब्रेन डेड दात्याचे हृदय मुंबईत आणून ते गरजूवर बसविण्याची शस्त्रक्रिया सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात करण्यात आली. आधी पुष्कळ त्रास सहन करणाऱ्या या रुग्णाची तब्येत या शस्त्रक्रियेमुळे आता व्यवस्थित झाली आहे. 

नवी मुंबईचे रहिवासी जेसन क्रेस्टो (वय 28) हे मर्चंट नेव्हीत होते. मार्च महिन्यात बोटीत असताना त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना एप्रिलमध्ये अमेरिकेतील दवाखान्यात नेले असता विषाणु संसर्गामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज आल्याचे दिसून आले. व्हायरल मायोकार्डायटिस या आजारामुळे त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ते जुलै महिन्यात मुंबईत आले.

अधिक वाचाः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद 

महिनाभर त्यांच्यावर सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होते आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करून हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नोंदणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात पुण्यात ब्रेनडेड दाता असल्याचे अधिकृतरित्या कळवण्यात आले. सर्व परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक मोटारीने पुण्यात गेले. दुपारी दात्याचे हृदय काढल्यावर विमानतळावरून चार्टर्ड विमानाने ते मुंबईत तासाभरात आणले गेले आणि लगेच रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन हृदय बसविण्यात आले. 

अधिक वाचाः  लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख 20 हजार 205 लोकं होम क्वॉरंटाईन

वैद्यकीय संकेतांनुसार दात्याचे हृदय काढल्यावर अडीच तासात ते रुग्णाच्या शरिरात बसवावे लागते. त्यासाठी ही सर्व घाई करण्यात आली आणि त्यासाठी जरूर तेथे ग्रीन कॉरिडोरही करण्यात आला. सर्व काळजी घेऊन पुढील उपचारही झाले आणि रुग्णाची तब्येत सुधारून तो घरीही गेला. हृदयविकार झालेल्या लाखांपैकी १० ते २५ जणांना व्हायरल मायोकार्डायटिस हा आजार होतो. त्यापैकी निम्म्या रुग्णांना कॉक्सॅकी बी विषाणुसंसर्ग झाल्याने ताप, छातीत दुखणे, थकवा आदी लक्षणे दिसतात. कोरोना आणि निर्बंधांच्या काळातही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सर्वांनाच अतीव आनंद झाला, असे रुग्णालयाच्या अॅडव्हान्स कार्डिअॅक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळ्ये म्हणाले.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Jason Cresto Heart transplant surgery successful Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jason Cresto Heart transplant surgery successful Mumbai