esakal | कल्याण डोंबिवलीत दांडिया रंग उतरला...
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कल्याण डोंबिवलीत दांडिया रंग उतरला...

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : मुंबई (Mumbai) पाठोपाठ ठाणे महानगरपालिकेनेही (Municipal) नवरात्रोत्सवात गरब्याला परवानगी नाकारली आहे. ठाणे (Thane) महापालिकेच्या निर्णयाचा कित्ता अनेकदा कल्याण डोंबिवली (Dombivali) महापालिकेकडून गिरविला जातो. त्यामुळे केडीएमसी ही शहरात हा निर्णय कधीही लागू करण्याची दाट शक्यता आहे.

कल्याण डोंबिवलीकर नवरात्रीत "डोंबिवली रासरंग" आणि "नमो रमो नवरात्री" या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र शिवसेनेने नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे, तर भाजपाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली माही. पालिकेनेही निर्णय जाहीर न केल्याने गरबाप्रेमींना मंडळांनीही गरब्याचे आयोजन केले नसल्याने यंदा गरब्याच्या रंग उतरला असल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकाक्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिली, मात्र मुंबई महापालिकेने महापालिका क्षेत्रात गरब्यास परवानगी नाकारली.

हेही वाचा: डोंबिवली पाठोपाठ भाईंदरमध्ये मुलीवर बलात्कार

मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिकेने ही आदेश जारी करत ठाण्यात गरब्यास परवानगी नाकारली आहे. ठाणे महापालिका निर्णयाचा कित्ता गिरवणारी कल्याण डोंबिवली महापालिकाही हाच निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. नवरात्रोत्सव तीन दिवसांवर आला असून अद्याप गरब्याविषयी कोणताही निर्णय जाहीर न झाल्याने मंडळामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मंडळांची घटस्थापनेची तयारी झाली असली तरी गरबाचे आयोजन करायचे की नाही हे मात्र अद्याप कोणीच ठरविलेले नाही.

डोंबिवलीत शिवसेना खासदार आणि भाजपा आमदार यांचा दांडिया उत्सव तरुणाईचे आकर्षण आहेत. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने "डोंबिवली रासरंग" व भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वतीने "नमो रमो नवरात्री" दांडिया उत्सवाचे मोठ्या स्वरूपात आयोजन केले जाते. या दांडिया उत्सवात अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असल्याने त्यांना एक इव्हेंटचे स्वरूप गेल्या काही वर्षात प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: मुंबईतील 'या' परिसरात पाणी कपात; काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र तरीसुद्धा महापालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यभरातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपा ने आंदोलन केले. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुली होत आहेत. गरबा खेळण्यासाठीही राज्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याने डोंबिवलीतील भाजपा काय निर्णय घेते हे पहावे लागेल.

- याविषयी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

- भाजपाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय होताच तो कळविला जाईल.

- शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

- शिवसेनेचा रासरंग यंदा रंगणार नसून, भाजपाचा नमो रमो नवरात्री तरी होतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- नवरात्रोत्सवातून मतांचे राजकारण रंगत असते. महापालिका निवडणुका जवळ आल्या असून, राजकीय पक्ष त्या दृष्टीने सरसावले आहेत. निवडणूकाच्या दरम्यान आलेले सण उत्सव हे राजकीय मंडळींना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली संधी असते. नवरात्र उत्सव हा केवळ गुजराती, मारवाडी, हिंदी भाषिक लोकांपुरता मर्यादीत राहिला नसून सर्वच भाषिक सहभागी हेात असतात. तरूण तरूणाई मोठया प्रमाणात सहभागी होत असते.

त्यामुळे नवरात्र उत्सव हा राजकीय व्यक्तींसाठी प्रचाराचं उत्तम साधन असते. मात्र कोरोनामुळे राजकीय लोकांच्या सर्वच संधी हुकत आहेत.

loading image
go to top