esakal | कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिका रखडली! खर्चात आणि 100 कोटींची वाढ शक्य!

बोलून बातमी शोधा

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिका रखडली! खर्चात आणि 100 कोटींची वाढ शक्य!
कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिका रखडली! खर्चात आणि 100 कोटींची वाढ शक्य!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा स्थानकांदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांचे काम भूसंपादनातील अडचणींमुळे चार वर्षे रखडले आहे. आता तिसऱ्या मार्गिकेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नव्या मार्गिकांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच लोकलच्या आणखी 24 फेऱ्या होण्याची शक्‍यता आहे. हा प्रकल्प मार्च 2020 पर्यंत पूर्ण करावयाचा होता; मात्र फक्त तिसऱ्या मार्गिकेचे काम या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. प्रकल्प लांबल्यामुळे खर्चही 100 कोटी रुपयांनी वाढला आहे. 

धक्कादायक - नराधम शिक्षक अल्पवयीन मुलीवरच करत होता लैंगिक अत्याचार

कल्याण-कसारादरम्यान उपनगरी रेल्वेसेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी केवळ दोन मार्गिका आहेत. मेल-एक्‍स्प्रेस गाड्यांना प्राधान्य द्यावे लागत असल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. एक्‍स्प्रेस किंवा मालगाडीचा अपघात झाल्यास रेल्वेमार्ग बंद होतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उपनगरी सेवेला फटका बसतो. लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण स्थानकात थांबा घेत असल्याने कल्याण ते आसनगावदरम्यान प्रत्येक लोकल अवेळी चालवण्यात येते. त्यामुळे या दोन मार्गिकांवर जादा ताण येत असल्याने तिसऱ्या मार्गिकेची मागणी प्रवासी संघटना सातत्याने करत आहेत. 

हेही वाचा - फणसाडमध्ये ट्रॅप कॅमेरे लंपास

या समस्येवर उपाय म्हणून कल्याण-कसारादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका तयार करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने 2011 मध्ये तिसऱ्या मार्गिकेला मान्यता दिली; मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात 2016 मध्ये झाली. यंदाच्या अर्थसंकल्पात 55 कोटींची तरतूद करण्यात आली असली, तरी भूसंपादनाअभावी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, वर्षाच्या अखेपर्यंत ही मार्गिका खुली करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. 

भूसंपादन अंतिम टप्प्यात 
तिसऱ्या मार्गिकेमुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढेल. या प्रकल्पासाठी उल्हासनगरमधील भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. भिवंडीतील 23 गावांपैकी 19 गावांचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. कल्याणमधील 14 गावांचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. आसनगाव ते कसारा मार्गावर काही ठिकाणी दगड फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

प्रकल्पाचे स्वरूप 
अंतर : 68.62 किलोमीटर 
टप्पे : कल्याण-वासिंद - 26.19 किमी, वासिंद-आसनगाव - 6.03 किमी, आसनगाव-कसारा - 35.40 किमी 
स्थानके : 12 
खर्च : सुरुवातीचा अंदाज 792.88 कोटी; सध्याचा अंदाज : 900 कोटी 

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू असून, कल्याण-वासिंद, वासिंद-आसनगाव, आसनगाव-कसारा या मार्गिकेतील 30 टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे. 

भूसंपादनातील अडचणींमुळे तिसऱ्या मार्गिकेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील, अशी अपेक्षा आहे. 
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी एकता संघ.