केडीएमटीच्या खासगी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

रविंद्र खरात
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

अटी व शर्तीनुसार ठेकेदाराने काम केले की नाही याबाबत चौकशी करू. करारनुसार जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल आयुक्तांना पाठविला जाईल, अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.

कल्याणः कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाने बस चालक पुरवठा करण्यासाठी एका खासगी ठेकेदाराची नेमणूक केली होती. मात्र, त्याचे काम असमाधानकारक असल्याने दररोज 2 लाखाचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका उपक्रमाच्या ताप्यात 218 बसेस असून, कर्मचारी वर्ग कमी असल्याने अनेक बसेस डेपो बाहेर निघत नाहीत. यावर उपाय म्हणून केडीएमटी प्रशासनाने मे. विशाल एक्सपर्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड यांना 100 बस चालक पुरवठा पुरविण्याबाबत 30 डिसेंबर 2016 रोजी ठेका दिला होता. संबधित ठेकेदाराने त्याला ठेका दिल्यावर 100 ऐवजी 25 ते 30 कर्मचारी दिले तर ऐन दिवाळीत त्याचे 7 कर्मचारी निघून गेले आहेत. ठेकेदारासोबत केलेल्या करारनुसार गेल्या साडे नऊ महिन्याच्या कालावधीत पूर्तता केला नसल्याचा आरोप शिवसेना परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी केला असून, यामुळे केडीएमटीचे दररोज 2 लाखाचे आर्थिक नुकसान होत आहे. संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली आहे.

केडीएमटीचा टायर फेल
गेल्या आठवड्यात एसटी कर्मचारी संपावर गेल्यावर उपन्नवाढीसाठी केडीएमटीला चांगली संधी होती. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे केडीएमटीला उत्पन्न कमवता आले नाही. कल्याण आरटीओने त्या चार ते पाच दिवसात खासगी बसेस आणि टॅक्सी, जीप 300 हुन अधिक लांब पल्ल्यात आणि शहरी ग्रामीण भागात सोडल्या होत्या. खासगी ठेकेदाराने जर कर्मचारी दिले असते तर त्याचा फायदा झाला असता. दुसरीकडे 45 वाहक आणि 25 चालक असे एकूण 70 कर्मचारी बस वर जाण्याऐवजी कारकुनी काम करत आहेत. कुणाच्या आशिर्वादाने करत आहेत? असा सवाल शिवसेना परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: kalyan news kdmt The demand for action on the private contractor