मुंबई महापालिकेची कारवाई अवैध, मला दोन कोटींची नुकसान भरपाई द्या - कंगना

सुनीता महामुणकर
Tuesday, 15 September 2020

BMC च्या पाडकामावर कंगनाची दोन कोटींची मागणी

मुंबई : बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवून तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतने दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. महापालिकेची कारवाई अवैध आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे.

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात अवैध बांधकाम असल्याचा आरोप महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यावर चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश ही पालिकेने दिले होते. मात्र तीने दिलेला खुलासा अमान्य करून पालिकेने पाडकाम केले आहे. याविरोधात तीने एड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत आता सिद्दीकी यांनी नवीन मुद्दे आणि मागणी नमूद केले असून सोमवारी रात्री सुधारित याचिका दाखल केली.

महत्त्वाची बातमी - छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

महापालिकेच्या अधिकार्यांनी विनापरवानगी घरामध्ये घुसखोरी केली, कारवाईच्या नावाखाली जाणीवपूर्वक तेथील झुंबर, सोफा आणि अन्य महत्त्वाचे दुर्मिळ सामानाची अवैधपणे तोडफोड केली आहे, बंगल्यातील सुमारे चाळीस टक्के बांधकाम तोडलेले आहे, त्यामुळे भरपाई म्हणून महापालिकेने दोन कोटी रुपये द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे. 

कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम बंगल्यात सुरू नव्हते, तसेच न्यायालयात याचिका केली आहे, असे सांगूनही कारवाई थांबविण्यात आली नाही, असाही दावा केला आहे. सुमारे 92 पानी याचिकेत महापालिकेच्या एच डब्ल्यू प्रभाग अधिकार्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई असून पुरेसा वेळही देण्यात आला नाही, असा आरोप केला आहे.

महत्त्वाची बातमी - "....नाहीतर संपूर्ण मुंबईत तीव्र आंदोलन छेडणार, मला अटक झाली तरी चालेल" - प्रवीण दरेकर

उच्च न्यायालयाने तूर्तास कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच याचिकेवर पालिकेला ता. 18 पर्यंत खुलासा करण्याचा अवधी दिला आहे. याचिकेवर अंतिम सुनावणी ता. 22 रोजी होणार आहे. वांद्रे येथील पाली हिलच्या बंगल्यात टॉयलेटच्या जागी कार्यालय, जिन्याच्याखाली टॉयलेट, पूजा खोलीत पार्टिशन इ. नियमबाह्य काम केल्याचा दावा महापालिकेच्या नोटीसीमध्ये आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

kangana ranaut demands two crore as compensation for the action taken by BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut demands two crore as compensation for the action taken by BMC