...अन् कर्नाटकच्या मजुरांना पुन्हा नवी मुंबईत परतावे लागले

migrant return
migrant return

नवी मुंबई (वार्ताहर) : लॉकडाऊनमुळे रोजीरोटीचे सर्व पर्याय बंद झाल्याने परराज्यातील शेकडो मजुरांनी आपापल्या राज्याची वाट धरली. माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्र सरकारने खास परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली; मात्र नवी मुंबईतून घरी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा नवी मुंबईतच परतण्याची वेळ आली आहे.

नवी मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाण्यासाठी एसटी बसने कर्नाटक सीमेवर पोहोचलेल्या 237 स्थलांतरीत मजुरांना कर्नाटक सरकारने राज्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे यातील सुमारे 80 स्थलांतरीत मजुरांवर पुन्हा नवी मुंबईत परतण्याची वेळ आली आहे. तर उर्वरीत दिडशेहुन अधिक मजुर कर्नाटक सीमेजवळ अडकून पडले आहेत. कर्नाटक सरकारने आपल्याच राज्यातील मजुरांना प्रवेश देण्यास नकार देऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे स्थलांतरीत मजुरांनी कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणावर संताप व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद झाले. मुंबईसह राज्यात कामानिमित्त आलेल्या स्थलांतरीत मजुरांची उपासमार सुरु झाल्याने या स्थलांतरीत मजुरांनी मुळगाव गाठण्यासाठी धडपड सुरु केली. कर्नाटक राज्यातून कामानिमित्त नवी मुंबईत आलेल्या 237 मजुरांनी कर्नाटक राज्यातील मुळगावी जाण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते. त्यामुळे परिमंडळ- 1 च्या पोलीस उपायुक्तांनी या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची सर्व प्रकारची कार्यवाही पूर्ण करुन त्यांना त्यांच्या मूळगावी कलबुर्गी येथे जाण्यासाठी 9 एसटी बसेसची व्यवस्था केली होती. 

त्यानुसार शुक्रवारी 237 स्थलांतरीत मजुरांना घेऊन एसटी बस कर्नाटक सीमेवर बेळगाव येथे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पोहोचल्या; मात्र सीमेवर तैनात असलेल्या कर्नाटक पोलिसांनी त्या वाहनांना आपल्या हद्दीत प्रवेश देण्यास नकार दिला.कर्नाटक पोलिस मूळगावी जाण्यासाठी सोडतील या आशेने 9 बसमधुन गेलेल्या 237 मजुरांनी शनिवारी दुपारपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून राज्यात प्रवेश मिळावा, यासाठी विनवणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही कर्नाटक पोलिसांनी राज्यातील मजुरांना प्रवेश देण्यास नकार दिला. अखेर 9 एसटी बसपैकी 3 बसमधील सुमारे 80 मजुरांनी नवी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच एसटी बसने ते शनिवारी रात्री उशीरा नवी मुंबईत दाखल झाले. 

मजुरांची फरपट
नवी मुंबईतून कर्नाटक राज्यात कुटुंबासह गेलेले व कर्नाटक राज्यात प्रवेश नाकारण्यात आल्याने पुन्हा नवी मुंबईत परतलेले वसंत भैरामडगी यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक राज्याने अशा अडचणीच्यावेळी आपल्याच राज्यातील नागरिकांची अशी अडवणूक करण्याची आवश्यकता नव्हती. तसेच आपल्या मुळगावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना याबाबतची पूर्वसूचना दिली गेली असती, तर त्यांची अशा प्रकारे फरफट झाली नसती, अशी प्रतिक्रिया वसंत भैरामडगी यांनी व्यक्त केली आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com