केडीएमसीने मांडली थट्टा!  गरिबांच्या वाट्याला कोरडा भात अन् विटलेली भाजी 

मयूरी चव्हाण-काकडे
Saturday, 2 May 2020

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन गरजूंना जेवणाचे पॅकेट वाटण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केली. मात्र या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून "किमान गुणवत्ता" असलेले जेवणही मिळत नसल्याने अनेक नागरिक फूड पॅकेट तसेच ठेवून उपाशीच राहत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळते. कोरडा भात अन विटलेली भाजी वाट्याला येत असल्याने, प्रशासनाने आमची थट्ट मांडल्याची चर्चा गोर गरीब नागरिकांमधून होत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन गरजूंना जेवणाचे पॅकेट वाटण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केली. मात्र या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून "किमान गुणवत्ता" असलेले जेवणही मिळत नसल्याने अनेक नागरिक फूड पॅकेट तसेच ठेवून उपाशीच राहत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळते. कोरडा भात अन विटलेली भाजी वाट्याला येत असल्याने, प्रशासनाने आमची थट्ट मांडल्याची चर्चा गोर गरीब नागरिकांमधून होत आहे.

क्लिक करा : राजस्थानात अडकलेले ठाणेकर विद्यार्थी परतले

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दररोज महापालिका क्षेत्रात 80 हजार जेवणाचे पॅकेट वाटले जातात. कल्याण पूर्व परिसरातही मोठ्या संख्येने जेवण दिले जाते. मात्र शनिवारी पूर्वेतील आडीवली ढोकळी व इतर परिसरात बेचव असलेल्या कोरड्या भाताचे वाटप केडीएमसीने दिल्याची तक्रार प्रेम यादव या जागरूक नागरिकाने केली. तसेच यादव यांच्या माध्यमातून अनेक कामगारांनी आपली व्यथा सकाळकडे मांडली.

अन्नाचा आम्ही आदर करतो पण जेवणाची गुणवत्ता इतकी निकृष्ट आहे की आम्ही जेवणाचे पॅकेट तसेच ठेवत असल्याचे कामगारांनी सांगितले. यापूर्वीही महापालिकेने दिलेल्या पुरी भाजीच्या पॅकेट मधील भाजी ही विटलेली असल्याची तक्रार समाजमाध्यमातून मांडण्यात आली होती.  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तपदाची सूत्र हातात घेताच धडाकेबाज कामगिरीला सुरवात केली. त्यामुळे आता जेवणाचे पॅकेट पुरवणाऱ्या कंत्राटदाराला आयुक्त तंबी देऊन जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा करतील का? ते पाहावे लागेल. 

क्लिक करा : मुंबई-पुणे शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी महत्त्वाचा खुलासा

पुलाव भात की खिचडी ?
कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी शनिवारी भात देण्यात आला. मात्र यात मीठ वगळता अन्य कोणत्याही वस्तू नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा नेमका पुलाव भात आहे की खिचडी भात हे सुद्धा ओळखणे नागरिकांना कठीण झाले आहे. 

दररोज 80 हजार फूड पॅकेट वाटले जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अन्न लवकर खराब होते. त्यामुळे भातात कमी मसाला वापरावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित लोकांना भात चवहीन लागत असावा. काहीतरी वेगळं म्हणून आम्ही पुरी भाजी देतो. याबाबत नोडल ऑफिसर ला पडताळणी करून गरज पडल्यास सबंधित भोजन व्यवस्थापकाला बदलण्याबाबत सूचना देण्यात येतील. 
- डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महापालिका. 

निकृष्ट जेवणाच्या माझ्याकडेही याबाबत तक्रार आली असून, कशा पद्धतीचे जेवण देण्यात येते याचे फोटोही काही नागरिकांनी पाठवले आहेत. कठीण काळात गरिबांना असे जेवण पुरविणे हे चुकीचे आहे. 
- कुणाल पाटील, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KDMC distriubtes worst quality meal