सुशांतच्या रुमचं लॉक तोडणाऱ्या चावीवाल्याने केले धक्कादायक खुलासे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. 14 जूनला सुशांतच्या रूमचं लॉक तोडणाऱ्या चावीवाल्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुंबई - बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, 14 जूनला सुशांतच्या रूमचं लॉक तोडणाऱ्या चावीवाल्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतच्या दरवाजाचं लॉक मोहम्मद रफी शेख नावाच्या चावीवाल्याने उघडलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चावीवाला रफी शेखला लॉक तोडल्यानंतर 2 हजार रुपये देण्यात आले आणि लगेच तिथून निघ असंही बजावण्यात आलं. रुममधून बाहेर पडताना अभिनेत्याची बहीणही तिथं होती असं रफी म्हणाला. 

रफी शेखने सांगितलं की, 14 जूनला सिद्धार्थ पिठानीचा फोन आला होता. त्याच्या सांगण्यावरून फ्लॅटवर पोहोचलो. मात्र हा फ्लॅट सुशांत सिंह राजपूतचा असल्याचं माहिती नव्हतं. सुशांतच्या रूमजवळ पोहचल्यानंतर लॉक पाहिल्यानंतर समजलं की ते कम्प्युटराइज्ड लॉक आहे. 

आणखी वाचा - सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली, 'सॉरी बाबू'

रफी शेखने सांगितलं की, लॉक उघडत असताना त्या ठिकाणी चारजण होते. लॉक उघडल्यानंतर लगेच त्या चार जणांनी मला जायला सांगितलं. तोपर्यंत मला त्या घटनेबद्दल काहीही माहिती नव्हती. लॉक निघताच मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथं असलेल्या लोकांनी मला बाहेर आणलं आणि जाण्यास सांगितलं. 

आणखी वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ?

दरवाजा उघडत असताना तिथं असलेल्या चारही लोकांपैकी कोणी घाबरलेलं दिसत नव्हतं. प्रत्येकाला फक्त दरवाजा उघडावा एवढंच वाटत होतं. तसंच त्यांनी पैशाबाबतही काही टेन्शन नाही असं सांगितलं होतं. दरवाजा तोडायला लागला तरी चालेल पण दरवाजा उघडायला हवा असं सांगितल्याचं रफी शेख म्हणाला. अद्याप रफीला तपास यंत्रणाकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. चौकशीसाठी बोलावलं तर नक्की सहकार्य करू असंही त्याने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keymaker claim after open sushant singh rajput room door he stopped to enter in room