esakal | फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा फटका फळांचा राजा हापूस आंब्यालाही बसला आहे. कोकणात लाखो टन हापूस आंबा तयार असूनही या आंब्याकडे ग्राहक राजाने पाठ फिरवली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून रोज 30 हजार पेट्या येत आहेत. मात्र संचारबंदीमुळे फळ मार्केटमध्ये ग्राहकच येत नसल्याने आंब्याचा व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे.

फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचा फटका फळांचा राजा हापूस आंब्यालाही बसला आहे. कोकणात लाखो टन हापूस आंबा तयार असूनही या आंब्याकडे ग्राहक राजाने पाठ फिरवली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून रोज 30 हजार पेट्या येत आहेत. मात्र संचारबंदीमुळे फळ मार्केटमध्ये ग्राहकच येत नसल्याने आंब्याचा व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे.

लॉकडाऊनमध्ये सुक्या मासळीला भाव

मार्च महिन्यापासून आंब्याच्या हंगामाला सुरुवात होते. एप्रिल महिन्यात हंगाम अधिकच बहरून येतो. फळ मार्केटमध्येही आंबा खरेदीसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडते. एकीकडे आंब्याच्या पेट्यांचा आणि बॉक्सचा खच तर दुसरीकडे ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची दरावरून सुरू असलेली घासाघीस, असे काहीसे दृश्य फळ मार्केटमध्ये असते. परंतु सध्या संचारबंदी असल्यामुळे ग्राहकांना घरातूनच बाहेर निघण्यावर बंधने आल्यामुळे निवडक ग्राहकच मार्केटकडे येत आहेत. 

नवी मुंबईत कोरोना जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओ

फेरीवाल्यांना रस्त्यांवर आंबे विक्रीची दुकाने लावण्यास महापालिकेने मनाई केल्यामुळे आंबे खरेदीसाठी बाजारात येणारा त्यांचा वर्गही आता कमी झाला आहे. बहुतांश ग्राहक हा फळांपेक्षा इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्राधान्य देत असल्यामुळे आंबा बाजारात पडून आहे. त्यामुळे गेल्यावर्षी दोन ते पाच हजार रुपयांना विकली जाणारी एक पेटी आता 800 ते दोन हजार रुपयांना विकली जात आहे.

शिल्लक राहिलेले आंबे परराज्यात
आंबा हे फळ नाशवंत असल्यामुळे व्यापाऱ्यांना फार काळ बाजारात साठवणूक करून ठेवता येत नाही. सध्या एपीएमसी बाजारात दररोज ३० हजार पेट्यांची आवक होत आहे. ज्या प्रमाणात आवक होते, त्याप्रमाणात ग्राहक नसल्यामुळे आंब्याची विक्री होत नाही. अशा परिस्थितीत आलेल्या आंब्याचा माल खपवण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून परराज्यातील व्यापारी मित्रांना कमी भावात आंबे पाठवून द्यावे लागत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा हंगाम चांगला आहे. तसेच तो वेळेवरही सुरू झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. परंतु संचारबंदीमुळे ग्राहकानेच मार्केटकडे पाठ फिरवल्यामुळे आंबा व्यापाराला हवा तसा उठाव अद्याप मिळालेला नाही.

- संजय पानसरे, आंबा व्यापारी

loading image