मधुवंती दांडेकर यांना किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार 

मधुवंती दांडेकर यांना किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार 


मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मधुवंती दांडेकर यांना राज्य सरकारचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मधुवंती दांडेकर यांनी अनेक नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. ‘अंगणी पारिजात फुलला’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘तारिणी नववसन धारिणी,’ ‘मधुकर वन-वन फिरत करी गुंजारवाला’, ‘ये मौसम है रंगीन’, ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ ही त्यांची गाणी विशेष गाजली. संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 

मधुवंती दांडेकर यांना गाण्याचा वारसा आपली आई मनोरमा यांच्याकडून मिळाला. आईकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर आईवडिलांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यासाठी भारत गायन समाजात पाठविले. त्यांनी 15 व्या  वर्षी संगीत विशारद पदवी मिळविली. त्यांना पंडित ए. के. अभ्यंकर, स्वरराज छोटा गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित राम मराठे, जयमाला शिलेदार अशा अनेक गुरूंकडून मार्गदर्शन मिळाले. छोटा गंधर्व यांनी त्यांना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा व अनेक चिजा शिकवल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचा गायक-नट मोहन दांडेकर यांच्याशी विवाह झाला. 

'एकच प्याला’, 'झाला महार पंढरीनाथ’, 'देव दीनाघरी धावला’, 'ध्रुवाचा तारा’, 'पती गेले गं काठेवाडी’, 'मदनाची मंजिरी’, 'मंदारमाला’, 'मानापमान’, 'संशयकल्लोळ’, 'सुवर्णतुला' आदी संगीत नाटकांमध्ये त्यांनी काम केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, विमलाजी ठकार, विद्याधर गोखले, छोटा गंधर्व यांच्यावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. नटसम्राट बालगंधर्व हे त्यांचे गाण्यातील आणि विमलाजी ठकार या आध्यात्मिक आदर्श आहेत. विमलाजींच्या अनेक हिंदी पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. हिंदी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com