डोंबिवली - उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेत एकाने आपल्या चुलत भावाला गोळी मारून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. नाना पावशे चौकातील एका इमारतीत बुधवारी रात्री ही हत्या झाली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करत गोळीबार करणाऱ्या भावाला अटक केली आहे. रणजित दुबे (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव असून रामसागर दुबे ( वय 29) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मृत रणजित दुबे हा कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका इमारतीत राहतो. अटक आरोपी रामसागर दुबे हे उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहे. जोनपूर येथे रामसागर, रणजीत यांची सामुहिक जमीन आहे. या जमिनीच्या विषयावरून त्यांच्यात मागील चार वर्षापासून वाद सुरू आहेत. मागील वर्षी या वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर दोघेही काही दिवस उत्तरप्रदेशातील तुरुंगात होते. अलीकडेच दोघेही तुरुंगातून बाहेर आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा जमिनीवरून वाद सुरू झाले होते. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान रणजीत आपल्या कल्याणमधील राहत्या इमारतीच्या बाहेर उभा असताना अचानक तेथे रामसागर आला. त्याने रणजीतच्या दिशेने गोळीबार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी रणजीत इमारतीच्या चौथ्या माळ्यापर्यंत धावत गेला. पण तेथे तो कोसळला. त्यानंतर रामसागरने धारदार शस्त्राने रणजीतवर वार करून त्याला ठार मारले.
मृत व्यक्तीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. कोळसेवाडी पोलीस व गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलिसांनी 24 तासात रामसागर याला उल्हासनगर येथून अटक केली.
दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. रणजित हा एका टोळीचा सदस्य होता. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. गोळीबार करणारा रामसागर हा उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.