मिठाची शेती कोरोनात अळणीच... उत्पादन ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत मिठाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे अद्याप मिठाची शेती सुरू झालेली नाही.

मुंबई : देशभरातील लॉकडाऊनमधून शेतीच्या कामांना सूट देण्यात आली आहे. मुंबईच्या सीमेवर असलेली मिठाची शेती मात्र अळणीच आहे. ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत मिठाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, अद्याप मिठाची शेती सुरू झालेली नाही.
 
हे वाचलं का? : हंगाम संपत आला; राज्यातील टूर गाईड रोजगाराविनाच!

लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यवहार ठप्प झाले. तेव्हापासून मिठाची शेतीही बंद आहे. त्यात सध्या तरी काम सुरू नाही. मिठागरे ओस पडली आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तसेच राज्यसभेतील खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याने प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. 

वाचालयाच हवं : तुमची कार व्हायरसला संपवणार!

सहस्रबुद्धे ठाणे जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात मीठ उत्पादकांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाऊन लांबल्यामुळे आता मिठाची शेती 3 मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मीठ उत्पादकांचे लक्ष्य आता शहा काय निर्णय घेणार याकडे आहे. मिठाची निर्मिती ही सुद्धा एक प्रकारची शेतीच आहे. मात्र, मीठ उत्पादकांना शेतकरी मानले जात नाही. तेही शेतकऱ्यांसारखे उत्पादनच घेत असतात, असेही सहस्रबुद्धे याांनी सांगितले. 

उन्हाळ्यात मीठ उत्पादन वाढत असते. त्यामुळे मीठ शेतीची परवानगी लवकरात लवकर देणे योग्य होईल. त्यामुळे मिठाची शेती करणाऱ्यांना लॉकडाऊनमधून सूट द्यायला हवी, असे सहस्रबुद्धे यांनी पत्रात म्हटले आहे. 

मीठ उत्पादक आशेवर
मीठ उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्याचबरोबर गुजरात, तमिळनाडू, राजस्थान तसेच आंध्र प्रदेशातही मिठाचीच मोठ्या प्रमाणावर निर्मीती होते. अमित शहा हे गुजरातचे आहेत. त्यामुळे ते नक्कीच मिठाच्या शेतकऱ्यांना सूट देण्याबाबत निर्णय घेतील, अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large quantities of salt are grown in Thane, Palghar and other districts. However, salt production has not yet started due to the lockdown