ठाणे जिल्ह्यात 'गंदगीमुक्त भारत अभियान' सुसाट 

राहुल क्षीरसागर
Thursday, 13 August 2020

नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडावा या हेतूने केंद्र सरकारच्या "जलशक्ती' मंत्रालयातर्फे "गंदगीमुक्त भारत अभियान' देशात राबवले जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 8 ऑगस्टपासून या अभियानाला सुरुवात झाली असून, जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी हे अभियान जोमाने राबवले जात आहे. 

ठाणे : नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडावा या हेतूने केंद्र सरकारच्या "जलशक्ती' मंत्रालयातर्फे "गंदगीमुक्त भारत अभियान' देशात राबवले जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 8 ऑगस्टपासून या अभियानाला सुरुवात झाली असून, जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी हे अभियान जोमाने राबवले जात आहे. 

क्लिक करा : राज्य सरकारकडूनच 'गणपती विशेष' रेल्वेगाड्यांची रखडपट्टी; मध्य रेल्वेने दिले स्पष्टीकरण

कल्याण तालुक्‍यातील ग्रामपंचायत बेहेरे येथेही गुरुवारी "गंदगीमुक्त भारत अभियान' राबवण्यात आले. या वेळी प्रत्येकाने आपल्या गावात स्वच्छता ठेवून गाव स्वच्छ, सुंदर ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपण स्वच्छतेविषयी नेहमीच सजग राहायला हवे. गावात स्वच्छता नांदली तरच गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी केले. याप्रसंगी बेहेरे गावात श्रमदान करण्यात आले. 

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना महामारीविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) छायादेवी शिसोदे यांनी दिली. या वेळी कल्याणचे गटविकास अधिकारी श्‍वेता पालवे, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील कर्मचारी तसेच जलसुरक्षक स्वच्छतागृही आशा सेविका उपस्थित होते. 

क्लिक करा : कोकणात रेल्वे सोडण्याबाबतचे घोडे अडलंय तरी कुठे? रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार

अभियानात विविध उपक्रम 
'गंदगीमुक्त भारत' अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर गावागावांमध्ये सरपंच व ग्रामसेवकांच्या नेतृत्वाखाली "सिंगल यूज प्लास्टिक'चे संकलन करून त्याची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावली जात आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या इमारतीची श्रमदानातून स्वच्छता, ग्रामस्थांना हागणदारीमुक्तीविषयी माहिती देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावातील भिंतींवर स्वच्छताविषयक संदेश रंगवून जनजागृती केली जात आहे. तसेच श्रमदानातून वृक्षारोपण, सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी "गंदगीमुक्त माझे गाव' या विषयावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. 

--------------
(संपादन : प्रणीत पवार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of 'Gandagi mukta Bharat Abhiyan' in Thane District