....या मार्गावरुन प्रवास करणे झाले मुश्किल

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

खारघर वसाहतीत बेशिस्त पार्किंग; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

खारघर : खारघर वसाहतीत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक, रस्त्यावर कशाही पद्धतीने उभी असणारी वाहने, या वाहतुकीच्या कोंडाळ्यातून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणारे पादचारी... असे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा ः  कर्नाळा  सहकारी बँकघोटाळा; विवेक पाटलांसह ७६ जणांवर गुन्हा दाखल...

चौकात बेशिस्तपणे थांबणाऱ्या रिक्षा, अनधिकृत व्यवसाय करणारे फेरीवाले आदींमुळे कोंडी होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे; मात्र या कारवाईनंतरही चित्र ‘जैसे थे’च आहे. या भीषण वाहतूक कोंडीचा फटका सामान्य पादचारी, नागरिकांना बसत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वसाहतीतील कोंडीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा ः गिधाडांमुळे बागायतदारांवर संक्रांत 

खारघरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने हिरानंदानी पुलाखाली वाहतूक कार्यालय सुरू केले; मात्र ते केवळ नावापुरतेच आहे. विशेषतः सायंकाळी ५ नंतर खरेदीसाठी घराबाहेर पडणारा दुचाकी, चारचाकी वाहनचालक रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी उभी करीत असल्यामुळे बॅंक ऑफ इंडियाकडून शिव मंदिरकडे जाणारा मेट्रो मार्ग,   सेक्‍टर १३, डेली बाजार चौकासमोरील आणि शिल्प चौकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून हिरानंदानी, उत्सव चौक, सेंट्रल पार्क परिसरात पथक नेमून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र वसाहत कोंडीच्या विळख्यात सापडली असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका कशी होणार, असा प्रश्‍न खारघरवासीयांना पडला आहे. 

याबाबत खारघरचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक आनंद चव्हाण यांना विचारले असता खारघर वसाहतीत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. 

या ठिकाणी होते कोंडी
- नवरंग चौक ते गोखले शाळा चौक
- खारघर सेक्‍टर १२, १३, २० आणि २१
- केंद्रीय विहार ते शिव मंदिर मार्ग
- रिलायन्स फ्रेशकडून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलकडे जाणारा मेट्रो मार्ग
- गोखले शाळेकडून शिल्प चौककडे जाणारा रस्ता
- सेक्‍टर ३४ मधील बॅंक ऑफ इंडियाकडून रामशेठ ठाकूर कॉलेजकडे जाणारा मेट्रो मार्ग
- डी-मार्टसमोरील अरुंद रस्ता

पनवेलमधील कोंडीमय मार्ग 
- लाईन आळी, उपजिल्हा रुग्णालय, जय भारत नाका, भाजी मार्केट, टपाल नाका, मिरची गल्ली, सोसायटी नाका, रुपाली सिनेमा, उरण नाका, मुसलमान नाका, मार्केट यार्ड 
नवीन पनवेल 
- उड्डाणपुलाजवळ एचडीएफसी सर्कल, टपाल कार्यालय, डी. ए. व्ही. हायस्कूल,  ओरीयन मॉलजवळील उड्डाणपुल 
कळंबोली
- प्रवेशद्वार, सुधागड एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, पोलिस वाहतूक शाखेतील परिसर, स्टील मार्केट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life is so risky in traffic congestion!