दिवा परिसरात 24 तासांपासून वीज गायब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

दहावीच्या परीक्षेच्या काळात दिव्यातील मुलांना आणि नागरिकांना अंधारात राहायची नामुष्की ओढवली आहे. मार्च महिना सुरू झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना विजेचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे.

ठाणे : दहावीच्या परीक्षेच्या काळात दिव्यातील मुलांना आणि नागरिकांना अंधारात राहायची नामुष्की ओढवली आहे. मार्च महिना सुरू झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना विजेचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या बुधवारी कळवा, मुंब्रा आणि दिव्यात महावितरणऐवजी टोरेंटने वीज वितरण हातात घेतले असून, विजेच्या समस्या कमी न होता त्यात वाढच होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. गेल्या 22 तासांपासून दिवेकर अंधारात असल्यामुळे टोरेंट प्रशासनाविरोधात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. याबाबत तीव्र आंदोलन करून प्रशासनाचे डोळे उघडू, असा संतप्त इशारा शहरातील नागरिकांनी दिला आहे. 

ही बातमी वाचली का? सुके मासे आता खाणार कसे?

कित्येक वर्षे उन्हाळा सुरू होताच विजेच्या समस्यांना वा वीज जाण्याच्या अडचणीला दिवावासीय सामना करत आहेत. त्यात वीज वितरण टोरेंट कंपनीने हातात घेतल्यामुळे काही तरी सुधारणा होईल, असे नागरिकांना वाटत होते. पण ते न होता गेल्या 22 तासांपासून दिव्यातील वीज गायब आहे. त्यामुळे दिवेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवली आहे. शहरातील दहावीच्या आणि शाळकरी मुलांना परीक्षेच्या कालावधीत याचा मोठा फटका बसला. टोरेंटोच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दिवा फेस 1 (दिवा पश्‍चिम पूर्ण, रेल्वे स्थानक परिसर, शिळ रोड, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव, फडके पाडा, सद्गुरु नगर, रिलायन्स टॉवर, रामनगर, सद्गुरु फेस 2, भोलेनाथ नगर), दिवा फेस 2 भारत गियर, मुंब्रा आदी विविध ठिकाणी विजेचा दिवस-रात्री खेळखंडोबा सुरू आहे. दिव्यातील या सर्व भागातील किमान 50 ते 60 हजार वीज मीटर बंद आहेत. 

ही बातमी वाचली का? कर्जमुक्तीचे पैसे तीन दिवसांत

कालपासून वीज गायब आहे. त्यासाठी कुठे अडचण आहे ते शोधण्याचे काम सुरू आहे. अजूनही ते शोधण्यात आलेले नाही. तसेच दातिवलीमध्ये विजेच्या रोहित्रावर वर काम सुरू आहे. लवकरच अडचण शोधून वीज पूवर्वत करू. 
- सतीश शहा, टोरेंट कंपनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning disappears in the Diva area for 24 hours in thane

टॉपिकस