आठवडा बाजार करायचा तरी कुठे?

तळा : तालुक्‍यातील मुख्य बाजारपेठेत झालेली ग्राहकांची गर्दी.
तळा : तालुक्‍यातील मुख्य बाजारपेठेत झालेली ग्राहकांची गर्दी.

तळा (बातमीदार) : तळा बाजारपेठेत दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार ग्राहकांनी भरगच्च भरलेला असतो. मात्र, जागेअभावी विक्रेत्यांची पुरती तारांबळ उडत असते. संपूर्ण तालुक्‍याला एकच मुख्य बाजारपेठ असल्याने येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी जागा अपुरी पडते.

तळा तालुक्‍यात ऑक्‍टोबर ते मेपर्यंत दर बुधवारी आठवडा बाजार भरत असतो. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसामुळे बंद असतो. संपूर्ण तालुक्‍याला एकच मुख्य बाजारपेठ असल्याने दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे व्यावसायिकांसाठी जागा अपुरी पडते. पूर्वी आठवडा बाजार स्टेट बॅंकेपासून जोगवडीला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत आणि तेथील आजूबाजूच्या परिसरापर्यंत पसरलेला असायचा. त्यामुळे कितीही दुकाने वाढली, तरी जागेची कमतरता भासत नव्हती; मात्र तेथील रस्त्याच्या कामामुळे बाजाराची जागा हलवण्यात आली.

सध्या आठवडा बाजार तळा बसस्थानकाच्या मागच्या बाजूस मच्छीमार्केट ते कमळ बॅंकेपर्यंत भरलेला असतो. बाजारात कटलरी, भाजीविक्रेते, खारी बिस्किटे विक्रीवाले, कपडेविक्रेते, सुकी मच्छीविक्रेते आदी व्यापारी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणतात. अपुऱ्या जागेमुळे व्यापाऱ्यांना पुरेसा नफा मिळत नाही. तालुक्‍यातील खेडेगावातील शेतकरी महिला आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी रानमेवा विक्रीसाठी आणतात; मात्र बाजारात जागा उपलब्ध नसल्याने बाहेर मिळेल त्या जागेत आपला माल विकावा लागतो. 

दर आठवड्याला नवीन व्यापाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे बाजारात इतर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

१० वर्षांपासून प्रत्येक आठवडा बाजारात भाजी विक्री करतो. तळा आठवडा बाजारात जागा अपुरी पडत असल्यामुळे संपूर्ण माल लावता येत नाही. पूर्वी ज्या ठिकाणी बाजार भरायचा, त्या ठिकाणी जागेची कमतरता भासत नव्हती.
- नीरज जयस्वाल, भाजीविक्रेता

माझा वडिलोपार्जित कटलरीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी जागा जास्त लागते; मात्र बाजारात जागा अपुरी पडत असल्यामुळे बराचशा सामानाची मांडणी करता येत नाही.
- राजेंद्र अडसूळे, कटलरी विक्रेता

मी गेली २० वर्षे सुक्‍या 
मच्छीचा व्यवसाय करत आहे. बाजारात टोपलीमध्ये बारीक सुकट, अंबारी सुकटीचा थर लावून विक्रीसाठी ठेवत असतो. गर्दी वाढली की, अपुऱ्या जागेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांचा धक्का लागून सुकट खाली पडते.
- राम भारसिंग, सुकी मच्छीविक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com