अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून लोकल धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून लोकल धावणार

मध्य, पश्चिम रेल्वेची तयारी पूर्ण; सामान्यांना प्रवेश नाही

अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून लोकल धावणार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्‍यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून (ता. 15) उपनगरीय लोकल सेवा सुरू होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबतची पूर्ण तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने रात्री उशिरा याबाबत आदेश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर केंद्रीय रेल्वे आणि आरोग्य मंत्रालयाने फक्त अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. यामध्ये इतर सामान्य प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही.

मुंबईतील कोरोनाबािधतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटी आणि बेस्टला अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांना अहोरात्र सेवा द्यावी लागत आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15 टक्के; तर खासगी अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांची संख्या 10 टक्के केल्याने अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी, बेस्टने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत.

सुरक्षित अंतरासाठी नागरिकांची खासगी वाहनाला पसंती! टू व्हिलर विक्रीला वेग येण्याची आशा

मोटरमनला सज्ज राहण्याच्या सूचना
राज्य आणि केंद्राच्या चर्चेअंती सोमवारपासून 10 टक्के उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याने रेल्वेने कारशेडमधील उभ्या असलेल्या गाड्यांची स्वच्छता व मोटरमनलाही तयार राहण्याच्या सूचना दिल्‍याचे न लिहिण्याच्या अटीवर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रेल्‍वे पोलिस नियंत्रण कक्षाच्याही सूचना
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून मुंबईत काही लोकल सुरू करणार असल्याने सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आपल्या स्टेशन हद्दीत आरपीएफ अधिकाऱ्यांसोबत स्टेशनवर प्रवेश करणारी व बाहेर जाण्यासाठीची ठिकाणे, रांगा, थर्मल तपासणी,  बॅरिकेट्‌स व पार्किंग ठिकाणे यांची पाहणी करावी, तसेच याबाबतचा अहवाल लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाच्या ई-मेल आयडीवर पाठवण्याच्या सूचना नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी दिल्‍या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारपासून लोकल चालवण्याची पश्चिम रेल्वेची पूर्ण तयारी आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

उच्चस्तरीय बैठकीतील चर्चेनंतर रात्री उशिरा लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला. 
- ए के जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

'हे' होतं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचं शेवटचं ट्विट...

loading image
go to top