लॉकडाऊनचा गणेशोत्सवाला फटका; मूर्ती घडवण्यासाठीही कामगार मिळेना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

गणेशोत्सवासाठी जेमतेम दोन महिने राहिले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मूर्तिकारांचे काम रखडले होते. आता कमी वेळ राहिल्याने मूर्तिकारांनी घरीच मूर्ती तयार करण्यास सुरूवात केली.

मुंबई : गणेशोत्सवासाठी जेमतेम दोन महिने राहिले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मूर्तिकारांचे काम रखडले होते. आता कमी वेळ राहिल्याने मूर्तिकारांनी घरीच मूर्ती तयार करण्यास सुरूवात केली. तर काही मूर्तिकार घराजवळील कारखान्यात जाऊन मूर्ती तयार करत आहेत. परंतु कारखान्यात मदतीस असणारे मजूर कोरोनामुळे गावी निघून गेल्याने मूर्ती काम कमी वेळात कसे पूर्ण करायचे, असा पेच मूर्तिकारांसमोर निर्माण झाला आहे. तसेच मूर्तिकारांनी घरीच काम सुरु केले; पण आता मूर्तिकारांना घरी जागा अपूरी पडत आहे. मुंबई पालिकांकडून अजूनही मूर्तिकारांना मूर्ती तयार करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे शाडूच्या मूर्ती सुकवायच्या कशा अशी समस्या मूर्तिकारांसमोर निर्माण झाली आहे. 

मोठी बातमी ः 'वंदेभारत' अभियानातून चार हजार प्रवासी राज्यात दाखल; जूनअखेर आणखी 38 उड्डाणे

बृहन्मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर म्हणाले, 'घरी मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती बनवतात. घरात मूर्ती बनवण्यासाठी जागा अपुरी आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडे जागेसाठी आतापर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार केला; पण अजून उत्तर आले नाही. पावसाळा आला आहे. एकीकडे पर्यावरणस्नेही शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी सांगतात. तसेच मंडप बांधणी, रंगकाम आणि आखणी करण्यासाठी मजूरही मिळत नाही. अशा अपुऱ्या सुविधामध्ये मूर्ती कशा घडवणार, असा प्रश्न तोंडवळकर यांनी उपस्थित केला. सरकारने स्वतः, महापालिका, समन्वय समिती, मूर्तिकार संघटनेचे सदस्य, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्यांची ऑनलाईन बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी गजानन तोंडवळकर यांनी केली. 

मोठी बातमी ः मुंबईकरांनो, तयार आहात का तुम्ही? तुमच्या सेवेत पुन्हा येत आहे 'ही' सुविधा

या वर्षी ग्राहकांकडून पर्यावरणस्नेही मूर्तीची मागणी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लहान मूर्तींची मागणी करत आहेत. परंतु शाडूच्या मातीसाठी कच्चा माल उपलब्ध होत नाही. मातीही दुप्पट भावाने मिळत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किंमती वाढू शकतात. त्यासाठी  राज्य सरकारने त्यासाठी सवलत द्यावी. मूख्यतः जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच कोरोनामुळे मदतीस मजुर नसल्याने एकट्या मूर्तिकारावर भार पडत आहे, बोरिवली येथील मूर्तिाकर कृष्णा बांदेकर यांनी सांगितले. 

मोठी बातमी ः कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का ? उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...

दरवर्षी पीओपी आणि शाडूच्या एकूण अडीचे मूर्ती तयार केल्या जातात. पण या वर्षी कोरोनामुळे कच्चामाल उपलब्ध होत नाही. मूर्तीकाम करण्यासाठी माझ्याबरोबर मदतीला दोघ-तीन मदतनीस असायचे. या वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते गावी निघून गेले. त्यामुळे माझ्या एकट्यावरचा भार वाढला आहे. त्यामुळे या वर्षी गणपती मूर्तीची ऑर्डर दरवर्षीप्रमाणे नाही तर त्यापेक्षा कमी असणार आहे, अशी माहिती मूर्तिकार अमोल हातीसकर यांनी दिली. सरकारची भूमिका अजून स्पष्ट नसल्याने आम्ही कामाला सुरुवात केली नाही. परंतु कोरोनामुळे माझ्या कारखानीतल बरेचसे कामगार बिहार निघून गेले आहे. ते परत येतील याबाबत खात्री नाही. जे कामगार येथे राहिले आहेत. त्याच्या बळावर दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने मूर्ती बनवणे शक्य नाही. अजूनही महापालिकेने मूर्ती तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही, अशी माहिती मूर्तिकार रेश्मा खातू यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown affects on ganesh festival as many labour gone away to home