esakal | प्रसंगी राज्यात पुन्हा लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

प्रसंगी राज्यात पुन्हा लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'सध्या जगभर कोरोना (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरपणे चर्चा सुरू असताना आपणही दुर्लक्ष करता कामा नये. प्रसंगी खंबीर पावले उचलत वेळ पडली तर पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लागू करावा लागेल', असा इशारा मुख्यमंत्री (Cm) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत दिल्याचे समजते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या (Third Wave) लाटेबाबत चर्चा झाली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील कोविड संदर्भात मंत्रिमंडळाला माहिती दिली. राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचाही यावेळी आढावा घेण्यात आला. टास्क फोर्सने केलेल्या सूचनांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. जागतिक पातळीवर कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आपल्याकडे केरळ राज्यात मागील आठवडाभरात रुग्णसंख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पुढील दीड ते दोन महिने महत्त्वाचे असल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो लावावेच लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: मुंबई: ठाण्यात नारळाचे झाड पडून तिघे जखमी

आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण साजरे होणार आहेत. यावेळी लोक एकत्र आल्याने संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा साठ लाखांपर्यत जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सभा, मोर्चे, आंदोलने, यात्रा आदींवर प्रतिबंध लावण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला. येत्या १५ सप्टेंबरपासून कोरोना संसर्गाचे आकडे वाढू लागतील, असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापसून कदाचित लॉकडाउन लावावा लागेल, अशी शक्यता मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: मुंबई : दोन महिन्यांतील कोविड मृत्यूंचा अभ्यास होणार

  • १२ आमदारांबाबत तोडगा नाहीच

विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांबाबत आजदेखील तोडगा निघू शकला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, कोरोनाची स्थिती आदींबाबत त्यांना माहिती देण्यात आली. राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला नाही.

नियुक्तीचा अधिकार तुमचा आहे; मात्र निर्णय लवकर घ्या, असे स्मरण आम्ही त्यांना करून दिल्याचे पवार यांनी सांगितले.

loading image
go to top