
लॉकडाऊन काळात महिलांचे वजन वाढले असून याचा सर्वाधिक परिणाम हा त्यांच्या हृदयावर झाला असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे.
मुंबईः लॉकडाऊन काळात महिलांचे वजन वाढले असून याचा सर्वाधिक परिणाम हा त्यांच्या हृदयावर झाला असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. हृदयविकाराचे प्रमाण हे महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक आढळतं, असा एक समज आहे. मात्र, महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे 'हृदयविकार' आहे. मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांचे जीवन एका फ्लॅटमध्ये बंदिस्त झाले होते. सलग सहा महिने घराबाहेर न पडल्यामुळे अनेकांना वाढलेल्या वजनाचा सामना करावा लागत असून यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.
मुलांना शाळेत पोहोचवायला जाणे, बाजारातून सामान आणणे तसेच जिम आणि योग वर्ग यावर बंधने आली. तसेच, नोकरदार महिलांचा प्रवास पूर्णपणे थांबल्यामुळे तसेच अनेक महिलांची नोकरी गेल्यामुळे त्यांच्या मानसिक ताणतणावात भर पडली. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आहे.
शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, " लॉकडाउन असताना तसेच लॉकडाउन संपल्यानंतर सर्वात जास्त मानसिक ताणतणावाला शहरातील महिला सामोऱ्या जात आहेत. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासातुनच महिलांचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. उच्च रक्तदाब, वजन वाढणे, कोलेस्ट्रोलची वाढ, मधुमेह असे अनेक आजार उद्भवून शेवटी याचा परिणाम हृदयविकारात होतो. काही महिलांनी सुडौल राहण्याच्या अट्टाहासातून डॉक्टरांच्या सल्याशिवाय वजन कमी करण्याच्या गोळ्या आणि इतर औषधे घेतल्या असून त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब तसेच रक्तामध्ये गुठळी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक महिलांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच व्यवसाय बुडाले त्यामुळे त्या मानसिक ताणतणावाला बळी पडत असून त्यांच्यात धूम्रपान तसेच मद्यपानाचे प्रमाण वाढीस लागले आहे. मानसिक ताणतणाव, धूम्रपान, खाण्याच्या बिघडलेल्या सवयी तसेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आरोग्य बिघडून त्याच्या परिणामी हृदयविकाराचा त्रास होण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे. त्यामुळे महिलांना तिशीमधेच हृदयविकार होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा- मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दिवसाला फक्त 8 नवीन रुग्ण
एका वैद्यकीय संशोधनानुसार, भारतामध्ये लॉकडाऊन काळामध्ये 27.5 टक्के नागरिकांमध्ये वजन वाढ आणि 33.4 टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा असल्याचे समोर आले आहे. महिलाचे वजन साठच्यावर असेल तर अनियमित मासिक पाळीच्या समस्यांत वाढ होते. तसेच गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. वजनवाढीमुळे महिलांमध्ये थायरॉईड, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहात वाढ होते. भारतातील महिलांचे सरासरी आयुर्मान 70 वर्षांचे असल्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर महिलांना सुद्धा पुरुषां इतकाच हृदयविकाराचा धोका असतो. दर चारपैकी एका महिलेला हृदयविकार जडला असल्याचे अनेक अभ्यासात आढळून आले आहे, असेही डॉ. तारळेकर यांनी सांगितले.
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Lockdown period womens weight gain directly affects womens heart