Lockdown : कधी कोरडा भात, तर कधी नुसती चपाती..., घर कामगार महिलांचं जगणं मुश्किल

women
women

मुंबई : कोरोनामुळे जगणे मुश्किल झाल आहे. घरखर्च भागवताना नाकी नऊ येतात. घरात भात शिजला, तर त्यासोबत खायला डाळ नाही. कधी चपाती मिळते, तर भाजी नसते... लॉकडाऊनमुळे कसेबसे दिवस काढावे लागत आहेत. ही व्यथा आहेत मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांची. 
मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर घरकाम करणाऱ्या महिला बेरोजगार झाल्या. काही जणींना पूर्ण महिन्याचा, तर बहुतेकींना काम केलेल्या दिवसांचाच पगार मिळाला. काम बंद झाल्यामुळे पगार थांबला. रोजच्या अन्नासाठीही परिस्थितीशी झगडा सुरू झाला. मुंबईत दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असल्याने आणि हक्काचे छप्पर नसल्याने अनेक मोलकरणींनी गावाचा रस्ता धरला. मिळेल त्या वाहनाने, नाही तर पायीच प्रवास सुरू केला.

मुंबईतच थांबलेल्या मोलकरणींची जमा केलेल्या पैशांवर गुजराण सुरू आहे. पैसा-पैसा वाचवून त्या संसाराचा गाडा रेटत आहेत. विधवा, एकट्या राहणाऱ्या घर कामगार महिलांची परिस्थिती आणखी  बिकट आहे. त्यांना आर्थिक आधाराबरोबर मानसिक आधाराचीही गरज आहे. मूळच्या मुंबईतील नसलेल्या महिलांना सरकारकडून रेशनही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 

घरभाडे कुठून द्यायचे?
घरकाम करणाऱ्या महिलांची कुटुंबे बहुधा भाड्याच्या घरात राहतात. घरमालक भाड्यासाठी तगादा लावतात. खाण्याचे वांधे झाले आहेत; आता भाडे कुठून देणार, असा सवाल अनेकींनी केला. कधी कधी एक वेळ उपाशी राहावे लागते. त्यामुळे घरकाम करणाऱ्या अनेक कुटुंबांनी मुंबई सोडून गावाकडे जाणे पसंत केले. चेंबूर परिसरातील सात कुटुंबांना घरभाडे देणे शक्य नव्हते. तेव्हा घरमालकांची समजूत काढून त्यांना गावी पाठवले, असा अनुभव कोरोच्या एका स्वयंसेविकेने सांगितला.

स्वयंसेवी संस्थांकडून मदत
काही स्वयंसेवी संस्था घर कामगार महिलांना अन्नधान्याची पाकिटे घरपोच देत आहेत. कोरो महिला मंडळ फेडरेशनच्या मुजताज शेख म्हणाल्या, माझी संस्था चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वाशी येथील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी काम करते. लॉकडाऊनमध्ये त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. अनेक महिला कामासाठी संस्थेकडे येतात. अनेकीना पूर्ण पगार मिळाला नाही. मालक त्यांना घरकामासाठी बोलावतात. परंतु, वाहतुकीची सोय नाही. या परिस्थितीचा कसा सामना करावा, असा पेच त्यांच्यासमोर आहे. संस्थेतर्फे अत्यंत गरजू महिलांना रेशन दिले. काही प्रमाणत वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदतही केली, असे त्यांनी सांगितले. 

माझ्या घरी सात लोक आहेत. सर्वांवरच घरी राहण्याची वेळ आली आहे. आईचा औषधपाण्याचा खर्च आहे. छोटा मुलगा शिकतो आहे. सरकारी रेशनवर घरात चूल पेटते. चार घरांत काम करत होते. दोन घरांतच पगार मिळाला. त्या पैशात कसेबसे दिवस काढत आहोत
- मनीषा माने, घर कामगार

मी चार घरांत दोन वेळचे जेवण बनवायचे काम करत होते. घरात पती, इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकणारा मुलगा, लग्न झालेली मुलगी, जावई आणि त्यांचे पाच महिन्यांचे बाळ आहे. लॉकडाऊनमुळे पती व जावयाचेही काम थांबले. घरात एक गोष्ट आज असते, तर उद्या नसते. आता 10 रुपयांना मिळणाऱ्या वस्तूंसाठी 20 रुपये मोजावे लागत आहेत. 
- सविता पंडित, चेंबूर

Lockdown Sometimes dry rice, sometimes just chapati it is difficult for women domestic workers to survive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com