प्रवाशांच्या सहनशीलतेचा होतोय कडेलोट; दक्षिण मुंबईत बेस्ट आणि एसटीसाठी लांबच लांबच रांगा

दिनेश मराठे
Tuesday, 22 September 2020

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील "लोकल रेल्वे काही सुरु होईना आणि प्रवाशांचे हाल काही संपेना " अशी परिस्थिती कायम आहे.  

 

मुंबादेवी: करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील "लोकल रेल्वे काही सुरु होईना आणि प्रवाशांचे हाल काही संपेना " अशी परिस्थिती कायम आहे.  

उपनगर, कर्जत, कसारा, कल्याण, विरार, पनवेल, बेलापूर, वाशी येथून नोकरी व्यवसायासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांच्या सहनशीलतेचे कडेलोट होतांना दिसून येत आहे. 'सकाळ'ने या प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. संयमशीलता संपली असून सरकारने प्रवाशांसाठी लवकरात लवकर रेल्वे सुरु करावी अशी मागणी या प्रवाशांनी केली आहे. 

निसर्गग्रस्तांची अद्यापही भरपाईसाठी वणवण; प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजीचे सूर

ऑपेरा हाऊस, चर्नी रोड, फोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, सिद्धार्थ कॉलेज, गेटवे ऑफ इंडिया, चर्चगेट, मुंबई उच्च न्यायालय, कुलाबा, रीगल सिनेमा, कलेक्टर ऑफिस विभागात सकाळी आणि संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर आपापल्या घरी जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

सध्या लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. इस्पितळ कर्मचारी सोडल्यास इतर लोकांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. फोर्ट,कुलाबा, कफपरेड येथे नोकरीसाठी येणाऱ्यांचे हाल होताहेत.

'शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष'! लोकसभेत आणि राज्यसभेत एकाच विधेयकावर वेगवेगळी भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप 

महिला कामगारांच्या सहनशीलतेचा होतोय अंत
दीपाली शेवाळे या फोर्ट येथे ऑफिस असिस्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रोजच्या  2-3 तास रांगा आणि होणाऱ्या रोजच्या प्रवासाच्या 180 रुपये खर्चाचे गणित मांडत होणाऱ्या त्रासातुन सरकारने सुटका करावी अशी मागणी केली आहे.

रोशनी उंबरकर
रोशनी उंबरकर या गरोदर महिलेने सांगितले की मी कामा निमित्त फोर्ट ला आले होते.आता या गर्दीच्या प्रवासात घरी निघाले आहे. सरकारने निदान महिला,रुग्ण आणि गरोदर महिलांसाठी विशेष बस सोडाव्यात.  महत्वाचे म्हणजे लोकल प्रवासाची परवानगी मिळावी.

दिनेश मेहता
हे विरार वरुन येथे व्यवसाय निमित्त येतात. प्रवासा ने त्रासलेले असल्याने अवघे 4 तासात सर्व व्यवहार उरकावे लागत असून बैंक,वसूली काम आवरते घेत परत विरार ला जावे लागते अशाने आधीच ठप्प होणाऱ्या व्यवसायात रोज ऐसाही चलेगा तो कल भूखे मरना पड़ेगा अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रमोद उपाध्ये 
हे नोकरदार असून सांताक्रुज येथून येजा करताना जीव नकोसा होतो असे म्हणत सरकारला आता तरी जाग यावी असे म्हटले आहे.

वली मोहम्मद शेख
हे वाशी वरुन रोज कामासाठी फोर्टला येतात.या रांगात उभे राहुन हतबल झालेत. शुक्रवार आमची नमाज असते या प्रवासामुळे ना अपने घर वक्त पे जा सकते ना खुदाके नमाजमे वक्त पर जा सकते है असे म्हणत आपली अगतिकता व्यक्त केली.

श्रावणी करंडे 
मला रोज फोर्ट ते मुलुंड असा बेस्ट ने प्रवास करावा लागतो प्रचंड मनस्ताप होतोय.इथे प्रवासाचा मोठा त्रास होतोय. रांगा लावा, बस आली की धावा, सीट पकड़ा नाही मिळाली तर उभ्याने च प्रवास अगदी वीट आलाय या रोजच्या धावपळीचा. 

सागर जगताप, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पक्ष
सरकारने सामान्य कामगारांचा लोकल रेल्वे प्रवास बंद करुन मोठा अन्याय केलेला आहे.लोकल बंद केली का? तर रेल्वे प्रवासाने कोरोना  वाढ़ीची भीती आहे मग हे हजारोंच्यां संख्येने प्रवासी बेस्ट बस, एस टी ने प्रवास करीत आहेत तर करोना नाही का वाढणार ?

शेखर गव्हाणे,मनसे, कुलाबा विभाग अध्यक्ष 
सविनय कायदेभं आंदोलन करुनही  राज्य आणि केंद्र सरकारने गेंड़याची कातड़ी पांघरली आहे. त्यांना सामान्य प्रवाशांबद्दल कणव उरली नाही.

रवि गरुड 
अध्यक्ष मुंबई- लोक जनशक्ति पक्ष 

सरकारने लवकरात लवकर लोकल रेल्वे सुरु करावी. प्रवाशयांची होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अशी विनंती करतो.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long queues for BEST and ST in South Mumbai