महाड दुर्घटना टळली असती; बांधकाम व्यावसायिकाच्या दुर्लक्षामुळे हकनाक बळी

तुषार सोनवणे
Tuesday, 25 August 2020

दुर्घटनेअगोदर मिळालेल्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. महाड येथील ‘तारीक गार्डन’ इमारत दुर्घटना हे त्याचे उदाहरण आहे.

महाड, : दुर्घटनेअगोदर मिळालेल्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. महाड येथील ‘तारीक गार्डन’ इमारत दुर्घटना हे त्याचे उदाहरण आहे. २००९ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत अल्पावधीतच कमकुवत झाली होती. मुख्य खांबाला काही दिवसांपूर्वी तडे गेले होते. याबाबतची तक्रार रहिवाशांनी इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. काही वेळा या खांबाची दुरुस्तीही केली होती, परंतु दुर्घटनेच्या दिवशी सकाळी १० वाजता खांबाला मोठा तडा गेला. याकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही. त्यामुळे रहिवाशांचा हकनाक बळी गेला. 

महाड इमारत दुर्घटनाः अमित शहांकडून दखल; दुर्घटनेवर अन्य नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया, जाणून घ्या

या पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी वाळूऐवजी पूर्णपणे ग्रीडचा वापर केल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. इमारतीचा बाह्य भाग अतिशय सुंदर असल्याने अनेकांनी घरे घेतली. काहींनी भाड्याने घरे दिली आहेत. ४५ सदनिका असलेल्या या इमारतीमध्ये ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन विंग आहेत. ही इमारत अल्पावधीतच कमकुवत होऊ लागली होती. इमारत कोसळण्यापूर्वीही काही काळ दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. याबाबत प्रत्यक्षदर्शी बशीर पारकर यांनी सांगितले, की दुर्घटनेला बांधकाम व्यावसायिक जबाबदार आहे. व्यावसायिक आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. या इमारतीच्या जवळच मोठा नाला होता. तो बुजवून केवळ दोन मीटर रुंदीचा नाला ठेवून त्यावर बांधकाम केल्याची तक्रार शेजारी असणाऱ्या नागरिकांनी केली.  

 

महाड शहरातील धोकादायक इमारतींच्या तक्रारी वेळेत आल्या तर धोका टाळता येईल. तारीक गार्डन इमारत दुर्घटना टाळता आली असती. 
संदीप जाधव,
उपनगराध्यक्ष, महाड

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mahad tragedy would have been avoided