महानगर गॅसची दरवाढ; सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी ११ रुपयांनी स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas cylinders

नैसर्गिक वायूच्या किमतीत नुकतीच मोठी दरवाढ झाल्याने ही वाढ केल्याचे महामुंबई परिसराला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या एमजीएल ने जाहीर केले आहे.

महानगर गॅसची दरवाढ; सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी ११ रुपयांनी स्वस्त

मुंबई - महानगर गॅसने सीएनजीच्या किमतीत प्रति किलो सहा रुपये तर स्वयंपाकाच्या पीएनजीच्या किमतीत चार रुपये प्रति घनफुट वाढ केली आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरच्या तुलनेत पीएनजी फक्त ११ टक्केच स्वस्त राहिला आहे.

नैसर्गिक वायूच्या किमतीत नुकतीच मोठी दरवाढ झाल्याने ही वाढ केल्याचे महामुंबई परिसराला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या एमजीएल ने जाहीर केले आहे. तीन ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच चार ऑक्टोबर च्या पहाटेपासून ही दरवाढ लागू होईल. त्यानुसार महानगर गॅसच्या सीएनजी ची किंमत सर्व करांसह प्रति किलोला ८६ रुपये असेल. तर स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती पाईपगॅस ची किंमत प्रति घनमीटर मागे ५२.५० रुपये एवढी असेल.

देशात उत्पादन झालेल्या नैसर्गिक वायूच्या किमती नुकत्याच केंद्र सरकारने ४० टक्के वाढवल्या आहेत. तसेच महानगर गॅस ला मिळणारा नैसर्गिक वायूचा कोटाही दहा टक्के कमी झाल्यामुळे महानगर गॅस ला अन्य ठिकाणहून महागडा गॅस खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ही भाववाढ केली जात असल्याचे महानगर गॅसने सांगितले आहे. तरीही मुंबईतील सध्याच्या पेट्रोलच्या दरांची तुलना केली तर महानगर गॅसचा सीएनजी अजूनही ४५ टक्के स्वस्त आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीशी तुलना केल्यास महानगर गॅस चा पीएनजी अकरा टक्के स्वस्त आहे, असेही महानगर गॅसने दाखवून दिले आहे.