राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण; किती तासांची मिळाली मुदत?

टीम ई-सकाळ
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत तासा तासाला नाट्यमय घडामोडी होत असताना, आज राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियार यांची भेट घेतली. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा आणखीच वाढला असून, दिवसभर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे समीकरण तयार होण्याची शक्यता असतानाच, शिवसेनेला बहुमतासाठीची जुळवाजुळव करण्यात अपयश आले. अखेर शिवसेना बाजुला झाली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रवादीला राज्यपालांनी निमंत्रित केले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुदतीत सरकार स्थापन करण्यात शिवसेनेला अपयश; काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात

काय म्हणाले जयंत पाटील? 
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'कायद्याप्रमाणे राज्यपाल महोयदयांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास निमंत्रित केले आहे. याबाबतचे पत्र आम्हाला पत्र दिले आहे. उद्या (12 नोव्हेंबर) रात्री आठ वाजेपर्यंत आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र, आम्ही आमचा सहकारी मित्र पक्ष काँग्रेसशी चर्चा केल्यानंतरच आम्ही याबाबत निर्णय घेऊ.' या संदर्भात शिवसेनेशी चर्चा करणार काय? या विषयावर बोलण्यास मात्र जयंत पाटील यांनी नकार दिला.

संजय राऊत यांच्या प्रकृती बद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

भाजपचे वेट अँड वॉच
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. राज्यातील संपूर्ण राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra governor gives 24 hours to ncp for government formation