आमदारांचेच कोरोना रिपोर्ट मिळेनात; विधानभवन परिसरात सावळा-गोंधळ

संजय मिस्किन
Monday, 7 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी निकराची दक्षता घेण्यात आली आहे. विधानभवात प्रवेश करणार्या प्रत्येक आमदार, कर्मचारी , अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

मुंबई:  कोरोनाच्या भयानक सावटाखाली आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. मात्र विधानभवन परिसरात अक्षरक्षः सावळा गोंधळ सुरू असल्याचे चित्र होते.  विद्यमान आमदारांनाही विधानभवनात प्रवेशासाठी ससेहोलपट करावी लागत होती. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी निकराची दक्षता घेण्यात आली आहे. विधानभवात प्रवेश करणार्या प्रत्येक आमदार, कर्मचारी , अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मागील दोन दिवस विधानभवन प्रशासनाने या चाचण्या घेतल्या. मात्र आज अधिवेशन सुरू होण्याच्या वेळेपर्यंत त्यांचे अहवाल आले नसल्यानं एकच गोंधळ उडाला.

अनेक आमदारांनी आपपल्या मतदारसंघातून कोरोना चाचणीचे रिपोर्ट आणले होते. पण विधानभवनाकडे नोंद नसल्यानं त्यांना प्रवेशद्वारात रोखण्यात आलं. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत ज्या आमदारांकडे कोरोना चाचणीचे अहवाल आहेत त्यांना प्रवेश द्या अशा सूचना केल्या. स्वतः अजित पवार प्रवेशद्वारावर उभे राहून आमदारांच्या प्रवेशाचे नियोजन करत होते.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांनंतर 'या' बड्या नेत्यांच्या घरी खणखणले धमकीचे फोन, वाचा सविस्तर

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या मराठवाड्यातील आमदारांनी वैद्यकिय प्रवेशाच्या संदर्भात तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या 70:30 हे प्रादेशिक सुत्र रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले.

मंत्र्यांसह तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल ४१५ जणांची चाचणी घेतली गेली त्यातल्या २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यात काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सचिव मंत्री,  विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचाः  VIDEO: लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन

सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्यामध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोक देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता आलं नाही. पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Maharashtra Monsoon Session First Day Vidhan Bhavan Corona Security


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Monsoon Session First Day Vidhan Bhavan Corona Security