महाराष्ट्रातही समूह संसर्गच, दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता - आयएमएम

भाग्यश्री भुवड
Wednesday, 21 October 2020

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत असले तरी दिवाळी दरम्यान रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे आय एम एचे म्हणणे आहे.

 

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत असले तरी दिवाळी दरम्यान रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे आय एम एचे म्हणणे आहे. त्यामुळे, दिवाळीपर्यंत संपूर्णपणे अनलॉक करणे चुकीचे ठरेल असा भीतियुक्त इशारा इंडिया मेडिकल असोसिएशनने दिला आहे. 

पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रात ही सध्या सामूहिक संसर्ग पसरला असून राज्य सरकार ही गोष्ट मान्य करत नसल्याचा आरोप ही आयएमएकडून करण्यात आला आहे. लोक कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याकारणाने रुग्णांची संख्या वाढली. शिवाय, ऑगस्टमध्ये थोडे रुग्ण कमी झाले पण, गणेशोत्सव काळात गर्दी होऊन पुन्हा सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढले. लोकांना सुट्ट्या असल्याकारणाने आता दिवाळीला बाजारात त्याही पेक्षा जास्त गर्दी होईल. शिवाय, आता रेल्वे ही सुरू केली गेली आहे. त्यामुळे लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यात सोशल डीस्ट स्टींग हे पाळले जात नाही. त्यामुळे नक्कीच दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढेल असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. 

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

गेल्या आठवड्यापासून मुंबई सह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शिवाय, मृत्यू दर आणि गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ही जरी सकारात्मक बाब असली तरी दिवाळीदरम्यान निश्चितच पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण सापडतील. त्यामुळे, एकाच वेळी संपूर्ण अनलॉक करणे धोक्याचे ठरेल असे ही डाॅ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. 

समूह संसर्ग सुरू - 

महाराष्ट्रात ही समूह संसर्ग सुरू झाला असून ही बाब महाराष्ट्र सरकार मान्य करत नाही. केंद्र सरकारच्या डाॅ. हर्षवर्धन यांनी ही पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यांमध्ये समूह संसर्ग असल्याचे म्हटले आहे. पण, महाराष्ट्राबाबत कोणीच काही बोलत नाही. समूह संसर्गाच्या ज्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंग चाचण्या व्हायला हव्या त्या होत नाही. सध्या चाचण्यांचे प्रमाण ही अतिशय कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी होतेय एवढं नक्की पण, कोणतेही विशेष असे प्रयत्न यासाठी केले जात नाहीत. याचा अर्थ व्हायरसची नैसर्गिकरीत्या जी ताकद आहे ती कमी होत असेल असे तज्ज्ञांचे निरीक्षण असल्याचे ही डाॅ. भोंडवे यांनी सांगितले आहे. 

अॅमेझॉन, फ्लिपकार्टनंतर मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा

फक्त काळजी घेणे महत्वाचे-

रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, सणानिमित्त होणारी गर्दी पाहता असा निर्णय घेणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे नागरिकांनी स्वतः सोबत इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे असे सल्ला ही डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra too, the number of patients is likely to increase again after Diwali - IMM