भिवंडीत मोठी दुर्घटना टळली, मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली

पूजा विचारे
Friday, 30 October 2020

भिवंडीत मोठी दुर्घटना टळली आहे. भिवंडीत असलेल्या दापोडा भागातील श्रीराम कम्पाऊंडमधील मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली आहे. दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली.

मुंबईः भिवंडीत मोठी दुर्घटना टळली आहे. भिवंडीत असलेल्या दापोडा भागातील श्रीराम कम्पाऊंडमधील मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली आहे. दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे. कामगारांना सुट्टी झाल्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. 

दापोडा येथील श्रीराम कम्पाऊंडमध्ये मॉन्जिनीस केकचा कारखाना आहे. मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात केक आणि बेकरीचे पदार्थ या कारखान्यातून पाठण्यात येतात. मॉन्जिनीस केक कारखान्यात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दोन मजली इमारतीत असलेल्या कारखान्याचा पहिला मजला कोसळला. पहिला मजला कोसळल्यामुळे खालच्या मजल्यावर अतिरिक्त ताण पडला आणि त्यामुळे खालच्या मजल्यावरचे खांब तुटून गेले. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला तात्काळ देण्यात आली. माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. भिवंडी पोलिस पथकही सुद्धा घटनास्थळी दाखल झाले.

अधिक वाचाः  मिठाईवर कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी FDAची कारवाई, विक्रेत्यांकडून 51 हजारांचा दंड वसूल

या कारखान्यात एक ते दोन टनाचे दहा ते बारा केक बनवण्याचे ओव्हन आहे. पहाटे कामगारांची सुट्टी झाली त्यामुळे सर्व कामगार कारखान्याच्या बाहेर पडले होते. त्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. मात्र या दुर्घटनेत तीन कामगार कारखान्यात अडकले होते, त्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 

एमएमआरडीएकडे राईस मिलची परवानगी असताना दापोडा ग्रामपंचायतीनं बेकरीची परवानगी दिली. त्यानंतर हा मॉन्जिनीस केक कारखाना अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे.

A major accident Bhiwandi building of Monginis Cake Factory collapsed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A major accident Bhiwandi building of Monginis Cake Factory collapsed