मुंबईवर पुढील महिन्यात मोठ्या संकटाची शक्यता, कोविड किट सदोष निघाल्याने मोठा तुटवडा येणार ?

समीर सुर्वे
Thursday, 15 October 2020

या सदोष किट्‌सचा फटका मुंबईसह राज्यातील काही भागांना बसण्याची शक्‍यता आहे.

मुंबई, ता.15 : राज्य सरकारने विकत घेतलेले कोविड चाचण्याचे सदोष निघाल्याने आता मुंबईसह राज्यातील काही भागात नोव्हेंबरमध्ये किटचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जीसीसी बायोटेक या कंपनीकडून या किट्‌स खरेदी करण्यात आल्या होत्या.

राज्य सरकारला आतापर्यंत भारतीय आर्युविज्ञान परीषदेकडून कोविडच्या आरटी पीसीआर टेस्ट किट मिळत होत्या. मात्र, आता या टेस्ट किट मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 12 लाख 50 हजार किट खरेदीसाठी निवीदा मागवल्या होत्या. त्यातील सहा लाख 29 हजार किट्‌स राज्य सरकारला मिळाल्या होत्या. राज्य भरात यातील 2 लाख किट्‌स वितरीत करण्यात आल्या होत्या. त्यातील 25 हजार किट्‌स वापरल्यानंतर त्या सदोष असल्याचे आढळले. या किट्‌समुळे चाचणी योग्य पध्दतीने होत नसून अहवालही चुकीचे येत असल्याचे आढळले. त्यामुळे राज्य सरकारने या किट्‌स परत मागवल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधीत कंपनीला काळ्यायादीत टाकणार असल्याचे जाहीर केले आहे.

महत्त्वाची बातमी : राज्यात 'खरे हिंदुत्व' दाखवत मदरसे बंद करून शिष्यवृत्ती द्या: अतुल भातखळकर

या सदोष किट्‌सचा फटका मुंबईसह राज्यातील काही भागांना बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईत सध्या ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरतील एवढ्याचा किट्‌स शिल्लक आहेत. कोविडची चाचणी ऍण्टिजेन आणि पीसीआर किट्‌सच्या माध्यमातून होते. त्यात, पिसीआर किट्‌स या खात्रीलायक मानल्या जातात. मुंबईत रोज 10 ते 12 हजार टेस्ट किट्‌सची गरज असते. तर, राज्यात 90 हजार चाचण्या होतात.

मुंबईला कोविड चाचण्याची कमतरता भासणार नाही असा विश्‍वास पालिकेचे अधिकारी व्यक्त करत आहेत.पालिकेने निवीदा प्रक्रिया तयार केली असून मात्र ती राज्य सरकार बरोबर प्रसिध्द करणार आहे. असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई महानगर पालिकेने 12 लाख किट विकत घेण्यासाठी निवीदा प्रक्रिया तयार केली आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिलं पोस्ट कोविड सेंटर ठाण्यात

लखनऊ व्हाया कलकत्ता 

हाफकिन संस्थेने गेल्या महिन्यात बायो फार्मसिटीक्‍यूल या लखनऊच्या कंपनीला काळ्यायादीत टाकले होते. या कंपनीने कोविडच्या चाचणी किट्‌स वेळत दिल्या नव्हत्या. त्यानंतर पालिकेने पुन्हा निवीदा मागवून कलकत्ता येथील जीसीसी बायोटेक या कंपनीकडून किट्‌स खरेदी करण्यात आल्या. मात्र, लखनऊच्या कंपनीच्याच या किट्‌स असल्याची शक्‍यता आहे. या किट्‌स आता सदोष ठरल्या आहेत. 

( संपादन - सुमित बागुल )

major shortage of covid kits expected in mumbai in the month of november


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major shortage of covid kits expected in mumbai in the month of november