esakal | ''गोंधळात गोंधळ न घालता मोफत लसीकरणाचा प्लान आखा''
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

''गोंधळात गोंधळ न घालता मोफत लसीकरणाचा प्लान आखा'', भाजपची मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठीचा आराखडा राज्य सरकारने आणखी श्रेयवादाचा गोंधळ न घालता सादर करावा आणि त्याची कार्यवाही त्वरेने करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस निःशुल्क देण्याचे सरकारने जाहीर केले असले तरी त्याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. राज्य सरकारचे मंत्रीच यासंदर्भात उलटसुलट विधाने करीत असल्याने गोंधळात गोंधळ हेच या सरकारचे वैशिष्ट्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा टोलाही भातखळकर यांनी यासंदर्भात लगावला आहे.

हेही वाचा: Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल

राज्य सरकारमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावरून जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत किळसवाणा आहे. या नेत्यांकडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्यामुळे कोणाचीही मान शरमेने खाली जाईल, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत अशी आहे कोरोनाची परिस्थिती

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस द्या ही मागणी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने केली होती. आता आणखी गोंधळ न घालता सरकारने हा निर्णय त्वरेने जाहीर करावा. कारण एकीकडे 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार करतात, सरकारने असा निर्णय घेतल्याची माहिती अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नबाब मलिक देतात आणि युवराज (आदित्य ठाकरे) देखील याबाबत प्रथम ट्वीट करून नंतर ते डिलीट करतात. यावरून गोंधळात गोंधळ हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्वांच्या मोफत लसीकरणाचा प्लान सरकारने जाहीर करावा आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या निःशुल्क लसीकरणाला सुरुवात करावी, असेही आवाहन भातखळकर यांनी केले आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

make plan for vaccination atul bhatkhalkar demand state government

loading image