समाजमाध्यमांवर 'या' गाण्याने घातलाय धुमाकूळ!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

आधुनिक काळात जुन्या अवजारांना घरात जागाच उरली नाही. कवयित्री बहिणाबाईंना ज्या जात्यावर ओव्या सुचल्या, ते जातं आजकालच्या घरघंटीच्या आगमनात बहुतांशी घरांतून जणूकाही हद्दपार झालं आहे; मात्र आगरी धवला गीत म्हणून यूट्युब, टिकटॉक आदी समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ घालत आहे.

नवी मुंबई : आधुनिक काळात जुन्या अवजारांना घरात जागाच उरली नाही. कवयित्री बहिणाबाईंना ज्या जात्यावर ओव्या सुचल्या, ते जातं आजकालच्या घरघंटीच्या आगमनात बहुतांशी घरांतून जणूकाही हद्दपार झालं आहे; मात्र आगरी धवला गीत म्हणून यूट्युब, टिकटॉक आदी समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या एका गाण्याने जाते, पाटा, वरवंटा यांसारख्या अवजारांना उजाळा दिला आहे. गायक परमेश माळी यांच्या सुमधुर आवाजात ‘मांडीला जाता गो चाऊल दलायला, आणीला पाटा गो हलद वाटायला’ या गाण्याने आगरी समाजात पूर्वी मानात असलेल्या मात्र मागील १०-१५ वर्षांत घराच्या कोपऱ्यातही जागा नसलेल्या जाता आणि पाटा-वरवंटा याला मानाचे पान मिळवून दिले आहे.

ही बातमी वाचली का? विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..! लवकरच सुरू होतंय 'हे' केंद्र

याअगोदर लग्नात गायिलेल्या धवलामध्ये या अवजारांचा उल्लेख केला जात होता; मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते; मात्र आज आगरी-कोळी-कराडी समाजातील हळदी समारंभात ही अवजारे आता पुन्हा नव्याने अगदी सजलेल्या रूपात दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे नव्या पिढीलादेखील या जुन्या अवजारांची नव्याने ओळख होऊ लागल्याचे चित्र समोर आले आहे. लग्न समारंभात वाजवल्या जाणाऱ्या त्या धवला गीताच्या निमित्ताने मांडवात जात्यावर दळायला बसण्याचे नव्या पिढीला एक अप्रूप वाटू लागल्याचे चित्र लग्नघरांमध्ये दिसून येत आहे. विशेषत: शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मात्र लग्न समारंभाच्या निमित्ताने गावात येणाऱ्या करवल्या आणि करवलेदेखील या जुन्या अवजारांच्या प्रेमात पडत असल्याचे लग्न समारंभातून दिसून येत आहे.

ही बातमी वाचली का? अंबा नदीतील मासे नको रे बाबा!

आगरी-कोळी-कराडी समाजात यापूर्वी अगदी भात भरडायलादेखील मोठ्या आकाराचे जातेच वापरले जात होते. पाट्यावरच्या वाटणाचे कालवण म्हणजे अगदी घरोघरची रेसिपी बनत होती; मात्र काळानुसार जुन्या अवजारांनी आधुनिकतेचा साज चढवला आहे. जात्याच्या ठिकाणी आता घरघंटी आली आहे. पाट्याची जागा तर केव्हाचीच मिक्‍सरने घेतली आहे; मात्र नव्या दमाचे गायक परमेश माळी आणि प्राची सुर्वे यांनी गीतकार प्रकाश चौगुले यांच्या एका धवला गीताला नव्या उंचीवर ठेवले आहे. या नव्या दमाच्या धवला गीतांतून लग्नसमारंभात हव्या असणाऱ्या तांदळाचे पीठ आणि हळद दळणाच्या अवजारांचे महत्त्व कमालीचे वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाते, पाटा-वरवंटा यांसारख्या अवजारांना पुन्हा एकदा नवे दिवस आले आहेत.

ही बातमी वाचली का? चिकूची आवक 30 टक्क्यांनी घटली

यू-ट्युबसह टिकटॉक, फेसबुक आदी समाजमाध्यमांवर धवला गीताने धुमाकूळ घातला आहे. परमेश माळी यांच्या ‘मांडीला जाता गो चाऊल दलाला...’ या गाण्याने पुन्हा एकदा जुन्या अवजारांना प्रतिष्ठा मिळू लागली आहे. परिणामी, लग्नघरात ही अवजारे चांगली असावीत म्हणून नव्यानेच खरेदी करून आणण्याचा ट्रेंडही वाढताना दिसत आहे. आगरी हळदी समारंभात हमखास वाजवल्या जाणाऱ्या या धवला गीतावर फेर धरण्याबरोबरच तरुणाई आता त्या जुन्या अवजारांना आपल्या घरात चांगली जागा मिळवून देण्याला पसंती देत आहेत.

ही बातमी वाचली का? अन लहानग्यांना फुटला मायेचा पाझर...

आगरी समाजाचा असल्याने परंपरा जपणे हे माझे कर्तव्य आहे. लग्नांमध्ये ‘धवला’ गाण्याचे काम धवलारीन करते. खरं तर ती एका ब्राह्मणाचे काम करते. तिची जी चाल असते ती खूप सुंदर, ऐकण्यासारखी असते; मात्र या धवलाच्या गाण्यावर लोक नाचले पाहिजेत; तरच आगरी समाजाचे नाव पुढे येईल आणि या लग्नविधीमध्ये ‘जाते’ आणि ‘पाट्या’ला महत्त्व येईल, त्यामुळे हे गाणी निवडले. 
- परमेश माळी, गायक, डोंबिवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandila jata go chaul dalayala social media this song!