ग्राउंड रिपोर्ट : अनेक अडचणी आणि अनेक प्रश्र्न, मुंबई महापालिका असा देतेय कोरोनाशी लढा, वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

कोरोनाच्या संशयित आणि बाधित रुग्णांमध्ये दररोज मोठी वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची झुंज सुरूच आहे. 

मुंबई : कोरोनाच्या संशयित आणि बाधित रुग्णांमध्ये दररोज मोठी वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेची झुंज सुरूच आहे. 
वरळी आणि धारावीपाठोपाठ मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांची संख्या साडेचार हजारांवर गेल्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेले किंवा संसर्ग झालेल्यांना क्वारंटाईन करायचे कुठे, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. दाटीवाटीची वस्ती आणि लहान घरे अशा समस्येमुळे होम क्वारंटाईन शक्य नाही. विलगीकरण कक्षांसाठी रुग्णालये कमी पडू लागल्याने आता शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. महापालिकेची झुंज सुरू असली, तरी अजून कोरोना नियंत्रणात आलेला नाही. 

महत्वाची बातमी  : खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी

बाधितांच्या शोधासाठी विशेष दवाखाने 
कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने 184 विशेष दवाखाने सुरू केले आहेत. या विशेष दवाखान्यांत 5 मार्चपासून सुमारे 7500 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणीत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांवर महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह उपनगरी रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका असे पाच जणांचे पथक कार्यरत आहे. आतापर्यंत 53 हजार 386 ठिकाणी जंतूंनाशक फवारणी करण्यात आली आहे.

नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

शोधमोहीम तीव्र
हाय रिस्क आणि लो रिस्क असलेल्या भागांतील व्यक्तींचे घरातच किंवा महापालिकेने ताब्यात घेतलेल्या ठिकाणी विलगीकरण केले जात आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

11 आयएएस अधिकाऱ्यांचे पथक
कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 11 आयएएस अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार हे अधिकारी कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत. 

सहायक आयुक्तांना अधिकार
कोरोना रोखण्यासाठी करावयच्या उपाययोजना आणि अंमलबजावणीचे अधिकार 24 विभागांतील सहायक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर) आणि त्यांच्या पथकांना देण्यात आले आहेत. या कामासाठी नियोजन व व्यवस्थापनाचे अधिकारही त्यांना देण्यात आले करण्यासाठी पालिकेच्या संबंधित पथद्वारे करण्याचेही निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मोठी बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

75 हजार कर्मचारी तैनात
कोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेचे 75 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, सुरक्षा रक्षकांसह घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण, पाणीपुरवठा, कीटकनाशक आदी विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

28 हजार सफाई कामगार
महापालिकेचे 28 हजार सफाई कामगार आणि 18 हजार कंत्राटी सफाई कामगार कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत आहेत. 

निवास-वाहतूक
लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था मुंबईतील काही हॉटेलांमध्ये करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बस, खासगी वाहने, ओला व उबर सेवा यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांची ने-आण केली जात आहे. 

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

पालिकेची 20 रुग्णालये
कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी महापालिकेची 20 रुग्णालये सज्ज आहेत. त्याचप्रमाणे काही खासगी रुग्णालये खुली केली आहेत. खासगी दवाखाने आणि प्रयोगशाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे पालन न झाल्यास कारवाई केली जाणार आहे. 

आठ तासांत अहवाल
कस्तुरबा रुग्णालय, हाफकीन यांच्यासह तीन नव्या प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे कोरोना चाचण्या केल्या जात असून, अवघ्या आठ तासांत अहवाल येत आहे.

Many difficulties and many questions, the struggle of the municipality to fight Corona

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many difficulties and many questions, the struggle of the municipality to fight Corona