कोरोनाकाळात प्रशासन व्यग्र आणि भूमाफिया सक्रीय; नवी मुंबईत उभारतायत अनधिकृत इमारती

सुजित गायकावाड  
Monday, 31 August 2020

न्यायालयाने सर्वच प्राधिकरणांना संपूर्ण नवी मुंबईचा सर्व्हे करून एका वर्षात अनधिकृत इमारतींचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपली आहे.

नवी मुंबई : कोरोना रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकारी व्यग्र आहेत. साहजिकच त्याचाच फायदा घेत संधीसाधू भूमाफिया सक्रिय झाले आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे आदी परिसरात तब्बल ४०० पेक्षा अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. चार मजली इमारतींसोबतच चाळींचाही त्यात समावेश आहे. विशेषत: खाडीकिनारे आणि गावठाणात असे इमले रचले जात असून कायदे आणि नियम पायदळी तुडवून बांधकामे होत असल्याने महाडसारखी दुर्घटना नवी मुंबईत घडण्याचा धोका आहे.

महाविकास आघआडीचा वाद तीन हात नाक्यांवर, कॉंग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

राज्यभरात चर्चा झालेल्या दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणानंतर नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीतील भूमाफियांचे जाळे किती खोलवर आहे, हे चव्हाट्यावर आले होते. उच्च न्यायालयाच्या दणक्‍यामुळे या भागातील ११० अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून सिडकोने २०१५ मध्ये न्यायालयात स्वतःहून ४९८ अनधिकृत बांधकामे असल्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने सर्वच प्राधिकरणांना संपूर्ण नवी मुंबईचा सर्व्हे करून एका वर्षात अनधिकृत इमारतींचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत ४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपली आहे.

दुर्देवी घटना, गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पमध्ये पडून चिमुकलीचा मृत्यू

तसेच दर चार महिन्यांनी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते; परंतु न्यायालयाच्या या आदेशाप्रमाणे अनधिकृत इमारती आणि दर चार महिन्यांनी त्या पाडण्याच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचा सिडको आणि महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. कोरोनामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत बाधकामांची आढावा घेणारी बैठकही झालेली नाही. त्यामुळे शहरात सध्या किती अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, याकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले असून कोरोना काळात ४०० पेक्षा अधिक बेकायदा इमारतींची कामे झाली आहेत. सिडकोच्या नियोजनातून सुटलेल्या आणि गावाच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर कच्चे बांधकाम करण्यात येते. त्यानंतर ते पक्के केले जाते. ही कामे रात्री करण्यात येतात. त्यानंतर ती भाड्याने देऊन कमाई केली जाते. 

दहा हजार अनधिकृत बांधकामे

  • सिडको व नवी मुंबई महापालिका यांनी उच्च न्यायालयासमोर २०१५ पर्यंतच्या सादर केलेल्या आकडेवारीनुसार सिडको हद्दीतील नवी मुंबई शहरात सुमारे ७ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. 
  • २०१५ मध्ये सिडकोने ५२८ अनधिकृत बांधकामांना नोटिसा 
  • बजावल्या होत्या. 
  • २०१२ पासून २०२० दरम्यान नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने १० हजार अनधिकृत बांकामांना नोटिसा बजावल्या आहेत. 

वाढीव बिलांप्रकरणी लवकरच सुनावणी, या दिवशी महावितरणला द्यावे लागणार उत्तर

लाखो रुपयांचा आशीर्वाद?
सिडको व नवी मुंबई महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावण्याचे काम केले जाते; मात्र पुढे कारवाई होत नाही. कारवाई होऊ नये म्हणून इमारतींच्या मजल्यानुसार मलिदा ठरवला जातो, असे समजते. मजल्यानुसार तो वाढतो. कारवाई केली जाऊ नये म्हणून स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही लाभ होतो. बेकायदा बांधकामांविरोधात दिघा बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. 

सबसे हटके, राज ठाकरेंच्या या फोटोची सोशल मीडियावर धूम

अनधिकृत बांधकामे असलेले ठिकाणे
चाळी :  चिंचपाडा, यादवनगर, आडवली-भुतवली, महापे, पावणे, तुर्भे एमआयडीसी, ऐरोली खाडी परिसर, गोठिवली खाडी परिसर, तळवली-घणसोली खाडी परिसर आणि कोपरखैरणे खाडी परिसर

चार मजली इमारती : घणसोली, गोठिवली, दिवा गाव, कोपरी, खैरणे, बोनकोडे, कोपरखैरणे, नेरूळ, शिरवणे, तुर्भे आणि महापे

नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका यंत्रणा त्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे दुर्लक्ष होऊन अनधिकृत बांधकामे वाढली असतील; परंतु विभाग अधिकारी वेळोवेळी नोटीस बजावत आहेत. पावसाळा संपल्यानंतर तात्काळ बेकायदा बांधकामांवर एका मोठ्या मोहिमेद्वारे कारवाई केली जाईल. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many illegal buildings were constructed in navi mumbai as nmmc administration busy in corona pandemic