मराठी सिनेअभिनेता घेतोय ठाणे जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार!

राहूल क्षीरसागर
Thursday, 3 September 2020

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हटले की, अनेक जण या नाक मुरडत असतात. मात्र, कोरोनाच्या महामारीत याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून यामध्ये गोरगरीब रुग्णांसह मराठी अभिनेत्याचा देखील समावेश आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हटले कि, अनेक जण या नाक मुरडत असतात. मात्र, कोरोनाच्या महामारीत याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून यामध्ये गोरगरीब रुग्णांसह मराठी अभिनेत्याचा देखील समावेश आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात बिग बॉस मराठी 2 फेम अभिनेता कोरोनावर उपचार घेत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता, जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे बघून नाके मुरडणाऱ्या नागरिकांसाठी हे रुग्णालय वरदान ठरू लागले आहे.

ही बातमी वाचली का? रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय... विद्या बालनने घेतली रियाची बाजू

कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता बिग बॉस मराठी 2 फेम अभिनेता अभिजीत केळकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती अभिजीत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. तसेच अभिजित केळकर हे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

ही बातमी वाचली का? 'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

केळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून केवळ त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केळकर यांना इतर रुग्णांमध्ये न ठेवता, त्यांना प्रिफॅब्रिकेटेड पोर्टेबल कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णच नाही तर, सिने अभिनेते देखील उपचारार्थ दाखल होण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला पसंती देत असल्याने आता, जिल्हा सामान्य रुग्णालय नाके मुरडणाऱ्या नागरिकांनाही आपलेसे वाटू लागले आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनास विचारले असता, रुग्णालय प्रशासनाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून अभिजित केळकर यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi film actor taking corona treatment at Thane District Hospital!