कोरोनायोद्ध्यांसाठी 'त्यांनी' पूर्ण केला 17,500 किलोमीटरचा पल्ला; कुठे आणि कसा? वाचा सविस्तर  

अनिश पाटील 
Wednesday, 20 May 2020

कोरोनाच्या संकटाविरोधात लढणाऱ्या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरातच मॅरेथॉन शर्यतीत जगभरातील 2200 धावपटू सहभागी झाले.

मुंबई : कोरोनाच्या संकटाविरोधात लढणाऱ्या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरातच मॅरेथॉन शर्यतीत जगभरातील 2200 धावपटू सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात घरातच धावून त्यांनी तब्बल साडेसतरा हजार किलोमीटरचा पल्ला पार केला. नवी मुंबईकर मॅरेथॉनपटूंनी आयोजित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ओमान, ब्रिटन आदी देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी 

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहे. या युद्धात डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आदी कोरोनायोद्धे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरातच धावून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा 6147 किलोमीटरचे अंतर कापण्याच्या उद्देशाने फ्युरियस रनिंग कल्चर फाऊंडेशन व रनर्स फर्स्ट इंडिया या दोन गटांनी 17 मे रोजी आगळ्यावेगळ्या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. ऑनलाईन करण्यात आलेल्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

मोठी बातमी ः अरे बापरे! पावसाळा ठरणार कोरोनासाठी पोषक? सरकारकडून समन्वय समितीची स्थापना

जगभरातून 2163 मॅरेथॉनपटूंनी नोंदणी केली. त्यात महाराष्ट्रातील 1317, तमिळनाडूमधील 167, राजस्थानमधील 90, कर्नाटकातील 82, उत्तर प्रदेशातील 80, गुजरातमधील 73 धावपटूंचा समावेश होता. संपूर्ण देशातून 2034 मॅरेथॉनपटू सहभागी झाले. ढाका येथील पाच, शारजाहमधील तीन, सिडनी येथील दोन, अटलांटा येथील एक, दुबईतील दोन, जकार्तामधील एक, टोरांटो येथील एक आणि अमेरिकेतील एका शहरातील एक असे परदेशांतील 25 स्पर्धकांनी भाग घेतला. 

मोठी बातमी ः बीकेसी मैदानातील दुसऱ्या कोव्हीड-19 रुग्णालयाच्या कामाला सुरुवात; अशी असेल सुविधा 

कुटुंबे धावली
पूर्ण मॅरेथॉन, अर्ध-मॅरेथॉन, 10 किलोमीटर, तीन किलोमीटर अशा प्रवर्गांत ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. धावपटूंनी 17,500 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याचे आयोजकांनी सांगितले. वैयक्तिक स्पर्धकांसह काही कुटुंबांतील सदस्य एकत्रितपणे सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात आयोजित करण्यात आलेली ही इनडोअर मॅरेथॉन प्रकारातील पहिलीच स्पर्धा असल्याचे फ्युरियस रनिंग कल्चरचे श्रीनिवास देबडवार यांनी सांगितले. त्यांनीही कुटुंबीयांसोबत या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathon players run for 17500 km for corona worriors