‘या’ शाळेत अखेर दोन शिक्षकांची होणार नियुक्‍ती

नेरळ : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना माथेरानमधील शिक्षकांबाबत निवेदन देताना.
नेरळ : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना माथेरानमधील शिक्षकांबाबत निवेदन देताना.

नेरळ (बातमीदार) : माथेरानमध्ये असलेल्या गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अन्यत्र समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांवर अतिरिक्त बोजा पडत असून, रिक्त शिक्षकांची पदे तत्काळ भरावीत, या मागणीसाठी राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्या वेळी गायकवाड यांनी रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दोन शिक्षकांची नेमणूक तत्काळ करण्याची सूचना दिली. दरम्यान, शाळेच्या अतिरिक्त शिक्षकप्रश्नी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती.

माथेरानमधील प्रा. शांताराम गवाणकर विद्या मंदिर पूर्वीची सरस्वती विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिसंख्या घटली आहे. त्यात या शाळेच्या शिक्षकांचे जिल्ह्यातील आणि तालुक्‍यातील इतर शाळेत समायोजन केले जात आहे. त्यामुळे अन्य वर्गातील अतिरिक्त शिक्षकांवर बोजा पडत आहे. पालकांनी वर्षाच्या सुरुवातीला शाळेने सहावीपासूनचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी केली होती. पालक आणि लोकप्रतिनिधींनी त्याबाबत जुलै महिन्यात रायगडचे शिक्षणाधिकारी दादासाहेब थोरात यांची भेट घेऊन आवश्‍यक त्या शिक्षकांची नियुक्ती शाळेत करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, अद्यापही शिक्षकांची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे. रोज दोन ते तीन वर्ग शिक्षकांविना चालवावे लागत असल्याने अन्य शिक्षकांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षण देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

प्रा. शांताराम गवाणकर शाळेतील अतिरिक्त झालेले शिक्षक दिनकर चव्हाण, सामाजिकशास्त्र व क्रीडा शिक्षक, तसेच वैशाली ढोले बी.एस.सी. बी.एड यांची सहावी ते आठवी वर्गासाठी फेरनियुक्ती करावी, या मागणीसाठी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त शशीभूषण गवाणकर आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्या वेळी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना त्या दोन्ही शिक्षकांची नेमणूक तत्काळ शाळेत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा आपल्याला संपर्क साधण्याची सूचना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी खेडकर यांना केली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या प्रभावाने मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानच्या गवाणकर शाळेत तब्बल १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने लवकरात लवकर माथेरानच्या शाळेत शिक्षक पाठवावे, अशी मागणी मनोज खेडकर यांनी केली आहे. आता माथेरानमधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षकांचा प्रश्न निकाली निघतो का? हे पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com