मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

दीपक शेलार
Wednesday, 12 August 2020

जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात 3 ऑगस्टला ठाणे खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शूटरला अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली होती.

ठाणे : कल्याणमधील मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुजरातमधून मुख्य सूत्रधार धर्मेश ऊर्फ नन्नू शहा याला ताब्यात घेतले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेला धर्मेश हा कुख्यात डॉन छोटा राजनचा हस्तक आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली असली तरी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत मौन पाळले आहे. 

हेही वाचा : आतापर्यंत 1520 पोलिसांचा सिडकोच्या घरांना प्रतिसाद

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात 31 जुलैच्या रात्री जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काम आटपून कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेश याचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक क्‍लब असून तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश ऊर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता. गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेशसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले अन्‌ येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरुवात झाली. 

नक्की वाचा : आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडत नाही खंड; भिवंडीतील दाम्पत्य जोपासताहेत शिकवण्याचा छंद

धर्मेश याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेशमध्ये 29 जुलैला वाद झाला व तो हाणामारीपर्यंत पोहोचला. याचवेळी धर्मेशने जिग्नेशचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा तिघा साथीदारांची मदत घेत 31 जुलैच्या रात्री कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाऊंडमध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. ठक्कर हत्या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता. 

सावधान! महिलांनो, साडी पडेल लाखात भारी

पोलिसांना तपासात मोठे यश 
जिग्नेश ठक्कर हत्या प्रकरणात 3 ऑगस्टला ठाणे खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शूटरला अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली होती. आता यातील प्रमुख आरोपी धर्मेश शहा याला पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले. धर्मेश हा छोटा राजन याचा मुख्य हस्तक असून जिग्नेशच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी धर्मेश स्वत: होता, त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 झाली असून पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासात मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

matka king Jignesh Thakkar case mastermind arrested by police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: matka king Jignesh Thakkar case mastermind arrested by police