खासगी रुग्णालयांच्या मुजोरीवर टाच; कोव्हिड रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरांना मेस्मा लावणार

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही रुग्णांना उपचारासाठी नकार देणे तसेच रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दणका दिला आहे.

नवी मुंबई : कोरोनासारख्या महामारीच्या काळातही रुग्णांना उपचारासाठी नकार देणे तसेच रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दणका दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयात कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

राज्यभरात पसरणाऱ्या कोरोनावर हवेतसे नियंत्रण न मिळवता आल्यामुळे अखेर राज्य सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत जाहीर केले आहे; परंतु यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही भागात सवलतींचा अनलॉकही केला आहे. याचा गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महापालिकेने निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने आरोग्य विभागातील रजेवर असणाऱ्या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांना पाचारण केले आहे. तसेच काही रुग्णालयांत कोव्हिड 19 च्या रुग्णांबाबत डॉक्टर आणि परिचारिका दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. राज्यावर निर्माण झालेल्या वैश्विक महामारीच्या काळात रुग्णांची हेळसांड करणे परिस्थितीला धरून उचित नाही. जे डॉक्टर व परिचारिका कामावर रुजू होणार नाहीत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतील, आपल्या कर्तव्यात कसूर करतील अशा डॉक्टर आणि परिचारिकांवर मेस्माअंतर्गत (महाराष्ट्र आवश्यक सेवा देखभाल अधिनियम 2006) कारवाई करण्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारने 21 मे रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के खाटा कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या संसर्गानुसार रुग्णालयांना टप्प्या-टप्प्याने खाटा आरक्षित करण्याच्या स्पष्ट सूचना मिसाळ यांनी दिल्या आहेत. 

अरे वाह! कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांच्या हाती आणखी एक यश

नातेवाइकांना अंतिम दर्शन मिळणार
कोरोनाबाधित मृतदेहापासून इतरांना लागण होऊ नये ही खबरदारी म्हणून राज्य सरकारने आखून दिलेल्या कोव्हिड-19 च्या मार्गदर्शिकेनुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कोरोनाबाधित मृतावर त्या-त्या पद्धतीने अंत्यसंस्कार होत असतात. या वेळी खबरदारीच्या उपाययोजना नसल्यामुळे अनेकदा मृतांचे नातेवाईक उपस्थित राहत नाहीत; परंतु अशा नातेवाइकांना अखेरच्या क्षणी आपल्या नातलगाचे अंत्यविधीचे दर्शन घेता यावेत करिता महापालिकेतर्फे मृतांच्या नातेवाइकांना तत्काळ पाच पीपीई कीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या कीटचा वापर करून नातेवाइकांना आपल्या कुटुंबातील सदस्याला अखेरचे दर्शन घेता येणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mesma will be applied to doctors who do not treat covid patients in navimumbai