मेट्रो सुरू झाली तरी उपयोग काय? व्हायचे तेच होणार, प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया!

निलेश मोरे
Monday, 31 August 2020

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो-1 सेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी प्रशासन राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र असे असले तरी सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वसई, विरार, पालघर, कर्जत, कसारा, कल्याणच्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ही सेवा असुविधा ठरणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. 

घाटकोपर : कोरोना संसर्गामुळे घातलेली बंधने केंद्र सरकारने हळूहळू उठवण्यास सुरुवात केली असून, देशातील मेट्रो रेल्वे सेवा 7 सप्टेंबरपासून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो-1 सेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी प्रशासन राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र असे असले तरी सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वसई, विरार, पालघर, कर्जत, कसारा, कल्याणच्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ही सेवा असुविधा ठरणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. 

ही बातमी वाचली का? महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

देशातील महानगरांमधील मेट्रो सेवा सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4 च्या टप्प्यात जारी केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईची मेट्रो सुरू होणार असल्याची चर्चा असून, राज्य सरकार यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मेट्रो-1चा पहिला टप्पा हा घाटकोपर ते वर्सोवापर्यंत आहे. मेट्रो-1 ही पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गाला जोडलेली आहे. या दोन्ही मार्गाच्या प्रवाशांना मेट्रो सेवा योग्य ठरते. मात्र सध्या सामान्य प्रवाशांसाठी लोकल रेल्वेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वसई, विरार, पालघर, कर्जत, कसारा, कल्याणच्या प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी असुविधा कायम आहे. दरम्यान, मेट्रो सुरू झाली तरी लांबचा पल्ला गाठणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या असुविधेमुळे मेट्रोतून प्रवास करणे फायद्याचे नसल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. 

दुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

गोरेगावला जाण्यासाठी घाटकोपर ते अंधेरी मेट्रोने प्रवास करायचो. लॉकडाऊनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने गोरेगावसाठी मेट्रोतून अंधेरीपर्यंत प्रवास करूनही निरर्थक ठरणार आहे. उलटपक्षी पुन्हा अंधेरीतून रिक्षा, बसेसच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. रेल्वेचा आधार घेतल्याशिवाय मेट्रोतून लांबच्या प्रवाशांना प्रवास करताच येणार नाही. 
- अनिल शिंदे, प्रवाशी. 

हेही वाचा : उदय सामंत यांची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

साकीनाका, अंधेरी प्रवाशांना लाभ 
घाटकोपर, अंधेरी व साकीनाका हे औद्योगिक परिसर असल्याने येथे लाखो कामगार अंधेरी ते घाटकोपर प्रवास करतात. घाटकोपर ते अंधेरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस व रिक्षा हा मार्ग असला तरी मेट्रो वन हा मार्ग प्रवाशांना सोपस्कर ठरणार आहे. सध्या प्रवासी बस आणि रिक्षा असा प्रवास करत आहे. यादरम्यान उशिराने येणाऱ्या बस, थांब्यांवर वाढणारी गर्दी, यामुळे बसमध्ये सामाजिक अंतर पाळता येत नाही. अशात मेट्रो सुरू झाल्यास अंधेरी व घाटकोपर प्रवाशांना मेट्रोचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया येथील काही प्रवाशी व्यक्त करत आहे. 
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro inconvenience to long distance passengers! will have to stand in line for Rickshaws,buses