प्रवास ट्रकने परंतु भाडे मात्र, राजधानी ट्रेन एवढे; कामगारांची करूण कहाणी

प्रवास ट्रकने परंतु भाडे मात्र, राजधानी ट्रेन एवढे; कामगारांची करूण कहाणी

मुंबई ः स्थलांतरीतांना घेऊन जाण्यासाठी जास्तीत जास्त श्रमिक स्पेशल सोडण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहेत, तर ट्रेन सुरु झाल्यानंतरही आपल्याला जाता येत नसल्यामुळे स्थलांतरीत मजूर नाराज आहेत. त्यामुळे ते मिळेल त्या मार्गाने, अवाच्या सवा भाडे देऊन प्रवास करीत आहेत.
ठाण्यातील तीन हात नाका येथून प्रयागराजसाठी काहींनी प्रत्येकी साडेतीन हजार मोजले आहेत. ठाण्यातील तीन हात नाका येथून प्रवास सुरु करणाऱ्यांपैकी अनेक जण मुलुंड येथील रामनगर झोपडपट्टीतील होते. त्या ठिकाणी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तो हॉटस्पॉट आहे. त्यातील काहींनी पैसे मित्र आणि नातेवाईकांकडून उसने घेऊन ट्रकने जाण्याचे ठरवले. 

आता हे लोक ट्रकमध्ये चढत असतानाही उत्तर प्रदेशातील काही जण त्यांच्याकडे आशेने बघत होते, पण ड्रायव्हर तसेच त्याच्या सहकाऱ्याची कोणतीही कृपा होणार नाही हे दिसल्यावर त्यांनी चालायला सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी पाकिटातील पैसे पुन्हा एकदा मोजले होते. पाठीवर सॅक पुन्हा टाकताना हात जोडले होते. ट्रॅककडे पुन्हा बघून त्यांनी चालायला सुरुवात केली.   

खर तर खिशात पैसे असलेले आपल्या नशीबावर खूष होते. त्यांनीही चालत जाण्याचे ठरवले होते, पण त्यांना अचानक जीवनावश्यक वस्तू लिहिलेला ट्रक दिसला. तो रिकामाच झाला होता. ट्रॅक चालक तर कुठे चाललात हे ऐकल्यावर खूषच झाला त्याला नाहीतर रिकामे जावे लागले असते. त्याने उत्तर प्रदेशातील प्रत्येकाच्या ठिकाणानुसार साडेतीन ते पाच हजार घेतले. राजधानीचे मुंबई - दिल्ली भाडे चार हजार आहे. त्यातून जास्त सुखाचा प्रवास झाला असता, पण ते त्यांना माहीती होते की नाही हा प्रश्नच आहे. 

ट्रक चालकाने ठाण्यात `सीटा' भरण्यास सुरुवात केली, त्यावेळी अनेकांना धक्का बसला. त्या ट्रकमध्ये यापूर्वीच गोरेगाव, शीव, वडाळा येथून काही जण आले होते. शीव ते ठाणे दरम्यान किमान सहा चेक पॉईंट आहेत. त्यातून हा ट्रक सुटला कसा हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र परिसरातील काही जण याप्रकारे प्रवास करणारे स्थलांतरीत चेक नाक्यापूर्वी उतरतात. तेथून चालत येतात आणि पुढे जाऊन पुन्हा ट्रकमध्ये बसतात, असे काहींचे मत आहे. 
शीव आणि वडाळा दरम्यानचे चेक पॉईंट टाळण्याची एक क्लुप्ती आहे. त्यासाठी वेगळा मार्ग घ्यावा लागतो. तो दाखवणारे `गाईड' असतात. ते बायपास, तुटलेल्या कम्पाऊंड भिंती, बिल्डींगमधून जाणारे रस्ते यातून कसा मार्ग काढायचा ते सांगतात. पण त्यामुळे प्रवास जास्त धोकादायक होतो. मात्र हा महागडा धोका पत्करण्यास ते तयार आहेत. आम्ही जर निघालो नाही तर आमचे मालक सरकारवर दडपण आणून आम्हाला येथे थांबवून घेतील, असे ते सांगतात. 

मुंबईतून बाहेर निघालेल्या या ट्रकमध्ये एक कुटुंब होते. त्यात आई वडिलांसह तीन मुले होती. बाकीचे साडेतीन हजार देत असताना आपल्या कुटुंबाचा प्रवास दहा हजारमध्येच होत आहे, याचे समाधान त्या कुटुंबाला होते. पण त्यांनेही ते कर्जाऊ घेतले होते. स्थलांतरीतांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने केली आहे, तरीही अनेक जण धोका पत्करतात. काही दिवसांपूर्वी चालत निघालेले, असाच ट्रक मिळाल्यावर नीट घरी पोहोचले होते. त्यांच्याबरोबर गेलो असतो तर आत्तापर्यंत पोहोचलो असतो. आता निघालो आहोत, असे त्यांनी सांगितले. पैसे किती जातात, यापेक्षा मुंबईतून निघत आहोत, याचे त्यांना जास्त समाधान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com