Raj Thackeray: नातू किआनसाठी आजोबा राज ठाकरे बनले फोटोग्राफर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
Raj Thackeray: नातू किआनसाठी आजोबा राज ठाकरे बनले फोटोग्राफर!

Raj Thackeray: नातू किआनसाठी आजोबा राज ठाकरे बनले फोटोग्राफर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणरायाचं आगमन झालेलं आहे. अमित ठाकरे यांना मुलगा झाल्यानं यंदा घरी गणपती बसवल्याचं ठाकरे कुटुंबाने सांगितलं आहे. दरम्यान, आक्रमक भाषण शैली आणि सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आज प्रेमळ अंदाजात दिसून आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे. या मुलाचं नाव त्यांनी किआन ठेवलं आहे. किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती. यंदा पुन्हा त्यांचं नातवावरचं प्रेम दिसून आलं आहे.

राज ठाकरेंच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपती बसला आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं की, यंदा आमच्या घरी बालगणेशाचं आगमन झाल्यानं घरी गणपती बसावा अशी माझी इच्छा होती, जी माझ्या घरच्यांनी पूर्ण केली आहे. हा इको फ्रेंडली गणपती आहे. आम्ही या गणपतीचं विसर्जन कऱणार नाही. तो तसाच ठेवणार आहोत. कारण सण उत्सवाबरोबर पर्यावरणाचंही भान राखलं पाहिजे. सगळ्यांना मी आवाहन करते की, घरच्या मूर्ती तरी विसर्जन करू नका, तशाच ठेवा.

दरम्यान, राज ठाकरे, अमित ठाकरे आणि घरातला सगळ्यात छोटा सदस्य किआन या तिघांनीही सारखेच कपडे घातले होते. यावेळी आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. राज ठाकरे यांनी अमित, सून मिताली आणि नातू किआन या तिघांचेही आपल्या फोनमध्ये फोटो घेतले. त्यांचं हे वेगळंच रुप सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.