Raju Patil : मनसेचा डोंबिवली बंदला पाठिंबा नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Raju Patil

Raju Patil : मनसेचा डोंबिवली बंदला पाठिंबा नाही!

डोंबिवली : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संतांविषयी केलेल्या वक्तव्याचे जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याच मुद्द्यावरून बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठाणे व डोंबिवली बंद ची हाक देण्यात आली आहे. भाजपा व शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसेने या बंद ला विरोध दर्शविला आहे. अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला आहे. परंतु बंद करून लोकांना वेठीस धरण हे आम्हाला पटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केले गेले तेव्हा सरकारने पुढाकार घेणे आवश्यक होते. परंतु ते त्यांनी केलेले नाही याचाच अर्थ या गोष्टींचे राजकारण केले जात आहे. जे काही करता प्रामाणिक पणे करा, लोकांना त्रास होईल असे राजकारण नको असा प्रामाणिक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांचा शिंदे गटाला देऊ केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांविषयी केलेल्या वक्तव्याचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमुळे वारकरी संप्रदायामध्ये अंधारे यांच्या विषयी नाराजीचा सूर उमटत आहे. अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितलेली आहे. परंतु हा वाद काही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि वारकरी संप्रदाय यांच्यावतीने शनिवारी ठाणे व डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे व फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मनसेचा या बंदला पाठिंबा नसेल असे सूचित केले आहे.

याविषयी आमदार पाटील म्हणाले, खरे तर सुषमा अंधारे यांनी जे वक्तव्य केले आहे साधू संतांबद्दल ते निषेधार्थ आहे. आम्ही पक्ष म्हणून पण त्याचा निषेध केलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम हिंदू जनतेने त्याचा निषेध केलेला आहे. महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे, आणि इथे अशा प्रकारची वक्तव्य कोणीही खपवून घेणार नाही. त्याचा वेगवेगळ्या प्रकारे कीर्तनकार कीर्तनातून निषेध करत आहेत, तर कोणी रस्त्यावर उतरून निषेध करत आहे. या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत आणि आम्ही त्याचे समर्थन करतो. परंतु बंद करून लोकांना वेठीस धरण हे आम्हाला कुठेतरी पटत नाही. मला वाटतं शिंदे गटाने पण या गोष्टीचा विचार करावा आणि निषेध करताना जी बंदची हाक दिली ती मागे घेण्यात यावी. अंधारे यांचे जे वक्तव्य आहे त्याचा आम्हीही निषेध करतो. आमचेही समर्थन आहे त्यांना. पण अशीच गोष्ट शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस सरकारने त्यात असाच पुढाकार घ्यायला हवा होता. पण त्यांनी तो घेतलेला नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी अशा गोष्टींमध्ये राजकारण करता. ते आणू नका जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करा.

महाराष्ट्राचे अस्मिता ही आपले राष्ट्रपुरुष साधुसंत आहेत. आपले दैवत असलेल्या शिवराय आहेत. अशा गोष्टीत तुम्ही पक्षपात न करता सरसकट एक भूमिका घ्यायला पाहिजे होती. ती पण यांनी घेतलेली नाही. त्यामुळे माझे प्रामाणिक त्यांना अशी विनंती आहे की लोकांना त्रास होईल अशी बंदची हाक जी त्यांनी दिलेली आहे ती मागे घ्यावी असा सल्ला आमदार पाटील यांनी शिंदे सरकारला देऊ केला आहे.