महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेचा गंभीर आरोप; मुलाच्या कंपनीला जम्बो कोव्हिड केंद्राचे कंत्राट दिल्याचे प्रकरण

समीर सुर्वे
Thursday, 20 August 2020

वरळी येथील जंम्बो कोव्हिड केंद्रात कामगार पुरविण्याचे कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला मिळाले असल्याचा आरोप करत मनसेने महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

मुंबई : वरळी येथील जंम्बो कोव्हिड केंद्रात कामगार पुरविण्याचे कंत्राट महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला मिळाले असल्याचा आरोप करत मनसेने महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.या प्रकाराबाबत लोकायुक्तां बरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे आज मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले.

सुशांतसिंह राजपूत मृ्त्यू प्रकरण! CBI चे पथक तपासासाठी मुंबईत दाखल

कोव्हिडसाठी देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये अनेक घोटाळे आहेत. त्याच घोटाळ्यांचा माग घेताना किश कॉर्पोरेट सव्हिसेस इंडिया या कंपनीला वरळी येथील केंद्रासाठी कामगार पुरविण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे आढळले.या कंपनीला कोणताही पुर्वानुभव नसतानाही कंत्राट मिळाले कसे हे शोधल्यावर त्याचे धागेदोरे महापौरांपर्यंत पोहचले. महापौरांच्या मुलाची ही कंपनी आहे. असा आरोप देशपांडे यांनी केला. कोविडच्या नावावर महानगर पालिकेत शेकडो कोटींचे घोटाळे झाले आहेत. अनुभव नसलेल्या अनेक कंत्राटदारांना कंत्राटे मिळाली आहेत. त्यातील अनेकांचे जाहीर झालेले मालक फक्त नामधारी असून प्रत्यक्षात त्या त्रयस्थ व्यक्तीच्या कंपन्या असू शकतील.याबाबतही तपासण होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची लोकायुक्तां बरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर; शिल्पा शेट्टीची बाप्पाचरणी प्रार्थना

मनसेने केलेले आरोप राजकीय आकसापोटी आणि सुडभावनेतून केले असल्याचा प्रतिहल्ला महापौर पेडणेकर यांनी केला आहे. या कंपनीत आपला मुलगा सहसंचालक असला तरी पालिकेचे सर्व कायदे नियम पाळूनच त्यांना हे काम मिळाले आहे.काही आक्षेप असेल तर ते महापालिकेकडे चौकशी करु शकतील.ही कंपनी 2011 मध्ये स्थापन झाली असून पालिकेची अनेक छोटी मोठी कामे केली आहेत.माझा मुलगा भारतीय नागरीक आणि सज्ञान असल्याने तो स्वत:चा व्यवसाय करु शकतो.हा खुलासा नसून नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून ही माहिती दिली आहे.असेही महापौरांनी नमुद केले. 

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS makes serious allegations against Mayor Kishori Pednekar