'मिर्झापूर असो वा महाराष्ट्र...'; मनसेचा ठाकरे सरकारवर घणाघात

Raj-Uddhav-Mirzapur
Raj-Uddhav-Mirzapur

Sachin Waze Case (मुंबई): महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापलथ घडवून आणणारं प्रकरण म्हणजे सचिन वाझे प्रकरण. उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यात प्रमुख संशयित असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणांमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आणि त्यांचे निलंबनही करण्यात आले. सचिन वाझे यांच्या विरोधात विविध पुरावे मिळत असल्याची चर्चा रंगल्यानंतर विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरूवात केली. पण अखेर या प्रकरणात कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा म घेता मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. हा निर्णय मनसेला फार पटला नसून त्यांनी याबाबत प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापूरचा एक सीन शेअर करत त्यावर नाराजी व्यक्त केली.

मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवरून आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये एक प्रसंग चित्रीत करण्यात आला आहे. त्या प्रसंगाची क्लिप शेअर करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मिर्झापूर वेब सिरीजमधील खलनायक पात्र त्याच्या मुलासोबत करत असलेल्या संवादाबाबतचा हा प्रसंग आहे. एका वादग्रस्त प्रकरणात खलनायकाच्या मुलाच्या मित्राचा राजकारणासाठी बळी दिला जातो. या प्रसंगानंतर, 'आज काय शिकलास?', असं  मुख्य खलनायक आपल्या मुलाला विचारतो. त्यावर, तो अतिशय सूचक उत्तर देतो. 'मला आज अशी गोष्ट शिकायला मिळाली की जेव्हा बळी द्यायची वेळ येते, तेव्हा शिपायाचा बळी दिला जातो. राजा किंवा राजपुत्र हे नेहमी (सत्तेच्या) गादीवर बसण्यासाठी जिवंत राहतात', असं तो आपल्या वडिलांना सांगतो. याच प्रसंगाचा आधार घेत, संदीप देशपांडे यांना तो व्हिडीओ पोस्ट केला असून, "मिर्झापुर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात!", असं कॅप्शन त्या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमवीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली. तर मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांनी कार्यभार स्वीकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com