Vidhan Sabha 2019 : ठाण्यात आता मनसे वापरणार शिवसेनेचं 'दिघे कार्ड'!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

निवडणुका आल्या की, शिवसेना आनंद दिघे यांचा खुबीने वापर करत आली. आता हाच कित्ता मनसेने गिरवून शिवसेनेतील दिघे प्रेमींना मतांसाठी साकडे घातल्याची चर्चा रंगली आहे.  

ठाणे : 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' असं समीकरण जरी रूढ असलं तरी शिवसेना-भाजप युतीच्या कुस्तीत अखेर 'ठाणे' मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिवसैनिक निराश झाले असतानाच आता याचा लाभ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवण्याचे ठरवले आहे.

मराठी मतांच्या जोरावर, तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्याईचा लाभ मिळेल, या आशेने ठाणे विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार तथा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपली उमेदवारी जाहीर होताच थेट दिघे यांचे शक्तिस्थळ गाठून दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून दिघे कार्ड वापरले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर गेले अनेक दिवस शिवसेना-भाजपची युती होण्याबाबत चर्वितचर्वण सुरु होते. मात्र, युतीचे जमले असले तरी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांचा हिरमोड झाला. हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा, यासाठी शिवसैनिकांनी जोरदार लॉबिंग केले होते, मात्र उमेदवारीची माळ भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या गळ्यात पडली.

दरम्यान, या मतदारसंघात मनसेच्या जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी थेट दिघे यांच्या शक्तिस्थळावर जाऊन दर्शन घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेहमीच निवडणुका आल्या की, शिवसेना आनंद दिघे यांचा खुबीने वापर करत आली. आता हाच कित्ता मनसेने गिरवून शिवसेनेतील दिघे प्रेमींना मतांसाठी साकडे घातल्याची चर्चा रंगली आहे.      

ठाणे शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघे यांचे ठाण्यात वेगळे स्थान होते. काही वर्षांपूर्वी दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची समाधी खारकर आळीतील मैदानात उभारण्यात आली आहे. ठाण्याची कुठलीही निवडणूक असली की, शिवसेना या समाधीवर नतमस्तक होऊनच विजयला गवसणी घालीत असे. आता मनसेने दिघे यांचे कार्ड या निवडणुकीत वापरून मतदारांना साकडे घातल्याचे बोलले जात आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : सदाभाऊ खोत यांच्या 'रयत'ला महायुतीत 'या' दोन जागा

- Vidhan Sabha 2019 : आरारारा...कोथरूडमधून महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात?

- Vidhan Sabha 2019 : काँग्रेस राष्ट्रवादीतल्या 'या' 20 आयारामांना युतीकडून संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS will use the idea of Shivsena in Thane constituency