मोखाडा : पोलीस उपनिरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या | Mokhada police station | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh targe

मोखाडा : पोलीस उपनिरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

sakal_logo
By
भगवान खैरनार

मोखाडा : शेतकऱ्यांची लुबाडणूक (Farmers fraud) केल्याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यातील (mokhada police station) पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे (Ganesh Targe) आणि मंगेश मुंढे (Mangesh Mundhe) यांची सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर तडकाफडकी बदली (job transfer) करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 2274 दिवसांवर

मोखाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे आणि मंगेश मुंढे यांनी व्यापारी, आदिवासी शेतकरी यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. गोपीनाथ खुताडे या शेतकऱ्याला १२ नोव्हेंबरला घोटी येथून गाडीत बैल घेऊन येत असताना आपल्या दलालांमार्फत अडवून मारहाण करत २१ हजार रुपये काढून घेतले होते.

या घटनेनंतर श्रमजीवीचे तालुका अध्यक्ष पांडू मालक यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे १५ नोव्हेंबरला तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. आमदार सुनील भुसारा यांनीही पोलिस अधीक्षकांना याबाबत पत्र देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. अखेर श्रमजीवी संघटनेने मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या दिला. यावेळी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी ही बाब पोलिस उपअधीक्षक शेखर गायकवाड यांच्या निर्दशनास आणून दिली.

श्रमजीवी संघटनेच्या या मोर्चात आपण संबंधित शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्याची कबुली पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे यांनी दिली. त्यावेळी तारगे आणि मुंढे यांच्याविरोधात दमदाटी केल्याच्या, पैसे लुबाडल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. यानंतर या तारगे आणि मुंढे यांनी शेतकऱ्यांचे लुबाडलेले सुमारे १ लाख ९५ हजार रुपये शेतकऱ्यांना परत करत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: रविवारी होणारी TET आणि UGC नेट परीक्षा एकाच दिवशी; वाचा सविस्तर

गुन्हा दाखल करण्याची मागणी

घटनेची दखल घेत पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तारगे यांची जिल्हा विशेष शाखा, पालघर येथे; तर मुंढे यांची केळवा सागरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.१८) तडकाफडकी बदलीचे आदेश दिले; परंतु मोखाड्यातील पीडित शेतकऱ्यांनी दोन्ही पोलिस उपनिरीक्षकांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

"पोलिस अधीक्षकांनी योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी, या घटनेबाबत पोलिस अधीक्षक योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.

- विवेक पंडित, संस्थापक श्रमजीवी संघटना.

पोलिस उपनिरीक्षक गणेश तारगे व मंगेश मुंढे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होताच, त्यांना मोखाडा पोलिस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

- सतीश गवई, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मोखाडा, पोलिस ठाणे.

loading image
go to top