मुंबई आकाशवाणीवरील मराठीची गळचेपी थांबवा; प्रकाश जावडेकर यांना लिहिले पत्र 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण 24 तासांवरून पाच-सहा तासांवर आणले. एफएम रेन्बो वाहिनी 1 मेपासून बंद करण्यात आली.

मुंबई : केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण 24 तासांवरून पाच-सहा तासांवर आणले. एफएम रेन्बो वाहिनी 1 मेपासून बंद करण्यात आली. एफएम गोल्ड वाहिनीवर सकाळी 10 ते दुपारी 3 असे फक्त पाच तास मराठी कार्यक्रम सादर केले जायचे; ही वेळ बातम्यांसाठी राखून ठेवली. अशा प्रकारे मुंबई आकाशवाणी केंद्रावर मराठीची गळचेपी सुरू आहे. बंद झालेली एफएम वाहिनी त्वरित सुरू करून मराठीची गळचेपी थांबवा, अशी विनंती खासदार अनिल देसाई यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून केली आहे . 

वाचा ः मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी 'हा' पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता...

लॉकडाऊनच्या काळात मुंबई आकाशवाणी केंद्रावरून मराठी कार्यक्रमांचे प्रसारण थांबवण्यात आले. अशा काळात दर्जेदार  किंवा जुन्या कार्यक्रमांचे पुनःप्रसारण आकाशवाणीवर करून रसिकांचे मनोरंजन करणे शक्य होते. परंतु, एफएम रेन्बो वाहिनी बंद करण्याचा घाट मुंबई आकाशवाणीने घातला. मराठी श्रोत्यांना त्यांच्या हक्कांच्या वाहिनीपासून वंचित करून मराठी भाषेची गळचेपी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल खासदार देसाई यांनी केला आहे. 

वाचा ः जन्मतः हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळाच्या उपचारासाठी आदित्य ठाकरेंनी दिला मदतीचा हात

खासगी वाहिन्यांना मराठी सक्ती करा
इतर सर्व राज्यांत खासगी एफएम वाहिन्या ठराविक वेळ प्रादेशिक भाषेतील संगीतासाठी राखीव ठेवतात. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतील खासगी एफएम वाहिन्यांवरून मराठी गाण्यांचे प्रसारण अतिदुर्लभ आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी एफएम वाहिन्यांना तातडीने आदेश देऊन प्रत्येक तासाला मराठी गीतांचे प्रसारण करणे सक्तीचे करावे, अशी विनंती देसाई यांनी जावडेकर यांना केली आहे.

वाचा ः मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या काय आहे सर्व प्रकार...

पत्रातील मागण्या

  • एफएम रेन्बो वाहिनीचे पुनरुज्जीवन करावे; ही वाहिनी पूर्णवेळ केवळ मराठी कार्यक्रमांसाठी असावी.
  • एफएम गोल्ड वाहिनीवरील मराठी कार्यक्रमांची वेळ पूर्ववत करावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp anil desai writes letter to prakash jawdekar on marathi on akashwani