'त्या' आल्या अन् मिळाला थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान; वाचा सविस्तर...

राहुल क्षीरसागर
बुधवार, 15 जुलै 2020

कोणतीही पूर्व कल्पना नसलेल्या आणि केवळ मतदानासाठी आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील सुषमा लोणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत शिवसेनेने त्यांना अध्यक्षपदी विराजमान केले

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक असल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मतदानाला हजर राहायचे, या उद्देशाने सर्व सदस्य जमले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज कोण भरणार, याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, कोणतीही पूर्व कल्पना नसलेल्या आणि केवळ मतदानासाठी आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील सुषमा लोणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत शिवसेनेने त्यांना अध्यक्षपदी विराजमान केले. यासर्व घडामोडींमुळे त्या आल्या मतदानासाठी आणि झाल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अशी जोरदार चर्चा निवडणुकीच्या ठिकाणी रंगली होती. 

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा; अध्यक्षपदी लोणे, तर उपाध्यक्षपदी पवार 

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, या पदासाठी पुन्हा आरक्षण जाहीर झाले. तसेच या अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता.15) निवडणुका पार पडल्या. यावेळी ठाणे जिल्हा परिषदचे अध्यक्षपद मागास प्रवर्ग (ओबीसी) हे आरक्षण जाहीर झाले. यासाठी ठाणे जिल्ह्यातील सात ते आठ ओबीसी महिला सदस्यांनी आपली वर्णी या पदावर लगावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घालण्यास सुरुवात केली. मात्र, अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत कुणालाच काहीही माहिती नव्हती.  

उल्हासनगरातही 'धारावी पॅटर्न' राबवण्याचा निर्णय; पालिका आयुक्तांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी संवाद

त्यात बुधवारी (ता.15) निवडणुकीचा दिवस उजाडला. अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ येत होती; तशी इच्छुकांमध्ये धाकधूक सुरु झाली. कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, केवळ पक्षश्रेष्ठींचा आदेशाने केवळ मतदानासाठी आलेल्या कल्याण खडवली गटाच्या सुषमा लोणे यांच्या नावाची अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी घोषणा करण्यात आली आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी अर्ज भरला मात्र त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही; नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांचा अधिकाऱ्यांना इशारा...

दरम्यान, या संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्षांशी संपर्क साधला असता, आपण केवळ पक्षाच्या आदेशानुसार मतदानासाठी पती सागर लोणे यांच्यासोबत आले होते. मात्र, पक्षाने माझ्या नावाची घोषणा करून व सर्वसामान्य कुटुंबातील महिलेचा सन्मान केला आहे. तसेच अध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल अशी कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच माझ्या घरातील काही मंडळी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते. 

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होणे म्हणजे सन्मानाची बाब आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या शिवसेनेतच घडू शकते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वामुळे एका समान्य कुटुंबातील महिलेले आज अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. 
- प्रकाश पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख, (ग्रामीण) तथा अध्यक्ष; महाराष्ट राज्य हातमाग महामंडळ.

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrs sushma lone elected as thane zilla parishad chairman