क्या बात! राज्यात एसटीची मालवाहतूक जोमात; एसटीचे 300 ट्रक सेवेत  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक माल वाहतूकीसाठी राज्यभरातून एसटीकडे मागणी करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन काळापुरती मालवाहतूकीला एसटीला परवानगी दिली.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक माल वाहतूकीसाठी राज्यभरातून एसटीकडे मागणी करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन काळापुरती मालवाहतूकीला एसटीला परवानगी दिल्याने कोकणातील हापूस आंब्याची वाहतूक केल्यानंतर एसटीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मालवाहतूकीला सुरूवात केली आहे. सध्या एसटीचे सुमारे 300 ट्रक सज्ज झाले आहे. 

मोठी बातमी ः नवी मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता

एसटीने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक मालवाहतुकीमध्ये ही दमदार सुरुवात केली आहे. सध्या एसटीकडे 300 ट्रक तयार आहेत. त्याचबरोबर काही जुन्या बसगाड्यांचे रूपांतर मालवाहू ट्रक्समध्ये करण्यात येत आहे. सध्या मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणे जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून त्यांच्यावर जिल्ह्यातील मालवाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. एसटीचे अधिकारी एमआयडीसी विविध प्रक्रिया प्रकल्प, उद्योजक, कारखानदार यांना भेटून एसटीच्या मालवाहतुकीबद्दल माहिती देत आहेत. 

मोठी बातमी ः कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल

विशेष म्हणजे कृषीजन्य प्रक्रिया केलेला माल, कृषिपूरक व्यवसायाशी संबंधित माल आणि शासनाच्या अन्य महामंडळाच्या गोदामातील मालाची वाहतूक प्राधान्याने करण्यात येत आहे. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी आपले दर आकारत आहे. माफक दर, नियमित व वक्तशीर सेवा हे एसटीच्या मालवाहतुकीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील विविध ठिकाणाहून 10 ट्रक मालवाहतुकीसाठी रवाना झाले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणार असून, प्रत्येक तालुकास्तरावर एसटीचे मालवाहतूक केंद्र निर्माण होणार आहे. जळगाव विभागातून मालवाहतुकीस सुरुवात झाली असून गुरुवारी (ता.28) रोजी पहिला मालवाहतूक ट्रक जळगाव विभागातून रंग व इतर प्लास्टिकचे साहित्य घेऊन यवतमाळ येथे रवाना करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासातही मालवाहतुकीचे नियोजन केले जात आहे.

मोठी बातमी ः काय सांगता..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार? वाचा कसा तो...

प्रत्येक आगारात एक ट्रक
राज्यातील प्रत्येक आगारात एसटी आपल्या स्वतःच्या मालवाहतुकीसाठी एक ट्रक असतो, असे सुमारे तीनशे ट्रक सध्या एसटीकडे आहेत. या ट्रकचा सध्या मालवाहतुकीसाठी वापर केला जात आहे. तसेच सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यात मालवाहतूकीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msrtcs parcel service responce is good in maharashtra